Home साप्ताहिक अर्थविश्व Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; दोन दिवसांत चांदी तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त

Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; दोन दिवसांत चांदी तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त

0
Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; दोन दिवसांत चांदी तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त

Gold Rate Today : अमेरिकेतून आलेल्या महागाईच्या आकडेवारीचा परिणाम कमोडिटी मार्केटपासून सराफा बाजारापर्यंत दिसून येत आहे. सोन्या-चांदीच्या दरात गेल्या दोन दिवसांत मोठी घसरण झाली असून, चांदीच्या दरात तब्बल 12,600 रुपयांची घट झाली आहे. सोन्याच्या दरातही 2,000 रुपयांची घसरण झाली आहे. ऐन सणासुदीच्या काळात मौल्यवान धातूंच्या किमती कमी झाल्याने खरेदीदारांसाठी ही संधी मानली जात आहे.

MCX वर शुक्रवारी सोन्याच्या दरात 1,200 रुपयांची घट झाली असून, सोन्याचा भाव 1,50,695 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. तर चांदीच्या दरात 2,600 रुपयांची घसरण झाली असून, चांदीचा भाव 2,30,270 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

याआधी गुरुवारीही सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. गुरुवारी चांदीच्या दरात तब्बल 10,000 रुपयांची घट झाली, तर सोन्याचा भाव 1,200 रुपयांनी कमी झाला. त्यामुळे दोन दिवसांत सोन्याच्या दरात एकूण 2,000 रुपयांची, तर चांदीच्या दरात 12,600 रुपयांची घसरण झाली आहे.

https://www.prahaar.in/2026/09/10/ganeshotsav-2026-pen-ganesh-idols-see-strong-demand-from-india-abroad-out-of-70-lakh-sold-20-lakh-sent-overseas-mumbai-news/

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचाही भारतीय बाजारावर परिणाम झाला आहे. ग्लोबल मार्केटमध्ये सोन्याच्या दरात 1.32 टक्क्यांची घसरण होऊन भाव 4,401.74 डॉलर प्रति औंसवर आला आहे. तर चांदीच्या दरात 5.45 टक्क्यांची घट झाली असून, चांदी 64.908 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे.

अमेरिकेतील महागाईची मजबूत आकडेवारी सोन्या-चांदीच्या दरातील घसरणीमागील प्रमुख कारणांपैकी एक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या आकडेवारीमुळे अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदरात वाढ करू शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीतील नफा वसुली केल्यानेही दरांवर दबाव आला आहे.

दरम्यान, डॉलर मजबूत होत असतानाच भू-राजकीय तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. Brent Crude Oil चा भाव 108 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आगामी काळात सोन्या-चांदीच्या किमती कोणत्या दिशेने जातील, याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here