Nashik : नाशिक शहरातील सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांच्या दर्जावरून गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. रस्त्यांची कामे निकृष्ट असल्याचा दावा करत विरोधक आणि काही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, आता या टीकेला महापालिका आयुक्त मनीषा खत्री (Municipal Commissioner Manisha Khatri) यांनी थेट उत्तर दिलं आहे. ‘रस्त्यांच्या कामात चूक दाखवून द्या, मी माझं नाव बदलेन,’ असं म्हणत आयुक्तांनी टीकाकारांना खुलं आव्हान दिलं आहे.
त्र्यंबकनाका परिसरातील रस्त्यांची आयुक्तांकडून पाहणी
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांची कामं सुरू आहेत. या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत असल्याने महापालिका प्रशासनाकडून रस्त्यांची तांत्रिक तपासणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आयुक्त मनीषा खत्री यांनी त्र्यंबकनाका परिसरातील सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी रस्त्यांच्या बांधकामाची पद्धत, वापरण्यात आलेलं साहित्य आणि निर्धारित तांत्रिक निकषांनुसार काम होत आहे की नाही, याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. रस्त्यांच्या गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिका आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केली.
https://www.prahaar.in/2026/09/07/nashik-5-crore-slaughterhouse-beef-market-project-in-nashik-halted-mayor-takes-major-decision/
चार संस्थांकडून रस्त्यांची गुणवत्ता तपासणी
नाशिक शहरातील रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत अधिक पारदर्शकता ठेवण्यासाठी चार वेगवेगळ्या संस्थांकडून तपासणी केली जात आहे. विशेष म्हणजे काँक्रिट रस्त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी IIT मुंबईच्या तज्ज्ञांकडूनही प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान शहरातील तीन प्रमुख काँक्रिट रस्त्यांची पाहणी करण्यात आली. यामध्ये त्र्यंबकरोडवरील खडकाळी सिग्नल ते ITI सिग्नल या रस्त्याचा, ITI सिग्नल ते पिंपळगाव बहुला तसेच गरवारे ते XL-O पॉइंट या रस्त्यांचा समावेश आहे.
कोअर कट करून काँक्रिटची जाडी तपासली
तपासणीदरम्यान रस्त्याच्या काँक्रिटची प्रत्यक्ष जाडी तपासण्यासाठी कोअर कट पद्धतीचा वापर करण्यात आला. रस्त्याच्या बांधकामासाठी निश्चित करण्यात आलेल्या तांत्रिक निकषांनुसार काँक्रिटची जाडी आणि कामाचा दर्जा आहे की नाही, याची पडताळणी करण्यात आली. महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, प्राथमिक तपासणीत रस्त्यांची कामं निर्धारित तांत्रिक मानकांनुसार योग्य असल्याचं आढळून आलं आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निष्कर्ष तज्ज्ञांचा सविस्तर अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. रस्त्यांच्या कामांच्या गुणवत्तेबाबत महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. IIT मुंबईच्या अंतिम तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच संबंधित ठेकेदारांना बिल अदा करण्यात येणार आहे. म्हणजेच, रस्त्यांच्या कामांचा दर्जा निर्धारित मानकांनुसार असल्याची खात्री झाल्यानंतरच ठेकेदारांची देयकं मंजूर केली जाणार आहेत.
https://www.prahaar.in/2026/09/07/nashik-rain-update-residents-of-nashik-the-coming-days-will-be-rainy-a-warning-has-been-issued-for-stormy-winds-accompanied-by-thunde/
‘चूक दाखवा, मी नाव बदलेन!’
दरम्यान, रस्त्यांच्या कामांवरून सुरू असलेल्या टीकेला आयुक्त मनीषा खत्री यांनी दिलेल्या थेट आव्हानामुळे या मुद्द्याला आता आणखी धार आली आहे. ‘रस्त्यांच्या कामात चूक दाखवा, मी माझं नाव बदलेन,’ अशी सडेतोड भूमिका आयुक्तांनी घेतली आहे. त्यामुळे एकीकडे रस्त्यांच्या गुणवत्तेची तांत्रिक तपासणी सुरू असताना दुसरीकडे आयुक्तांच्या या वक्तव्याचीही नाशिकच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे