मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी विविध अभियांत्रिकी, संकेत व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी मेन मार्ग तसेच हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचवेळी पश्चिम रेल्वेकडून वांद्रे ते गोरेगाव स्थानकांदरम्यान हार्बर मार्गावर स्वतंत्र मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने अनेक उपनगरी रेल्वे सेवा रद्द राहणार असून काही सेवा मार्गांतरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करूनच रेल्वे प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
https://prahaar.in/2026/08/07/western-railways-jumbo-block-on-the-harbour-line/
मेन मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ या वेळेत मेगाब्लॉक राहील. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा माटुंगा ते मुलुंडदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. तसेच ठाणेहून येणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल सेवाही मुलुंड ते माटुंगादरम्यान जलद मार्गावरून धावतील. या सर्व गाड्या नियोजित वेळेपेक्षा सुमारे १५ मिनिटे उशिराने धावतील. याशिवाय, सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे येणाऱ्या आणि तेथून सुटणाऱ्या सर्व अप व डाऊन लोकल गाड्या सरासरी १५ मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे.
https://prahaar.in/2026/08/07/mumbai-crime-news-male-passenger-beaten-women-in-mumbai-local-train/
हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान डाऊन मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४०, तर चुनाभट्टी/वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० या वेळेत देखभाल बंद राहील. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वाशी, बेलापूर, पनवेल, वांद्रे आणि गोरेगावकडे जाणाऱ्या तसेच पनवेल, बेलापूर, वाशी, गोरेगाव आणि वांद्रे येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या अनेक हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पश्चिम रेल्वेकडून वांद्रे ते गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० या वेळेत हार्बर मार्गावर देखभाल बंद घेण्यात येणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–वांद्रे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–गोरेगाव तसेच चर्चगेट–गोरेगाव दरम्यानच्या काही उपनगरी रेल्वे सेवांवरही परिणाम होणार आहे.
https://prahaar.in/2026/08/07/housing-societies-must-immediately-remove-ramps-and-encroachments-on-footpaths-otherwise-strict-action-will-be-taken/
प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी पनवेल आणि कुर्ला (फलाट क्रमांक ८) दरम्यान २० मिनिटांच्या अंतराने विशेष लोकल सेवा चालविण्यात येतील. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीत मेन मार्ग आणि पश्चिम रेल्वेच्या सेवांमधून अतिरिक्त भाडे न आकारता प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. पायाभूत सुविधांची सुरक्षितता, दुरुस्ती आणि रेल्वे वाहतुकीची विश्वासार्हता कायम राखण्यासाठी हा मेगाब्लॉक आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले असून, प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वे वेळापत्रकाची खात्री करूनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.