सहायक आयुक्त कुठे कुठे डोक फोडणार
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि अडथळामुक्त व्हावा, या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेमार्फत ‘पेडेस्ट्रियन फर्स्ट’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देत सहायक आयुक्तांना विभाग स्तरावरील या कामाचा दैनंदिन आढावा घेण्यास सांगितले आहे. परंतु हे काम प्राधान्याने सहायक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता देखभाल विभाग आणि परवाना निरिक्षक यांच्यावतीने केले जाते. परंतु अनेक विभागांमध्ये हेच अधिकारी सहायक आयुक्तांना जुमानत नसून अशाप्रकारचे निष्काळजी अधिकारी असतील तर सहायक आयुक्त कुठे कुठे डोक फोडणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. (BMC News)
https://prahaar.in/2026/08/05/fir-filed-against-those-dumping-unauthorized-debris-in-malad-dharavali-municipal-corporation-takes-a-tough-stand-no-leniency-henceforth/
मुंबईत पहिल्या टप्प्यात ३२० किलोमीटर लांबीच्या पदपथांवरील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. प्रशासकीय विभागांच्या सर्व सहायक आयुक्त यांनी विभाग स्तरावर या कामाचा दैनंदिन तर उप आयुक्त यांनी प्रत्येक आठवड्यातून एकदा परिमंडळनिहाय आढावा घेऊन त्याचा अहवाल अतिरित महानगरपालिका आयुक्त यांना सादर करावा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांनी दर १५ दिवसाला आढावा घ्यावा. या मोहिमेत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा, दिरंगाई अथवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. आदेशाचे पालन करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिला आहे. ( Footpath Encroachment)
त्यानुसार काही विभागामार्फत ही कारवाई सुरु असली तरी अनेक विभागांमध्ये सहायक आयुक्तांचे देखभाल विभागाचे सहायक अभियंता हे ऐकतच नसून आपण कारवाई केली तर त्याचे श्रेय सहायक आयुक्तांना मिळेल म्हणून अनेकांकडून या कारवाईला गती दिली जात नाही. उलट ही कारवाई किती कमी होईल यासाठी प्रयत्न केला आहे. पदपथावरील अतिक्रमण हटवण्यासाठी फेरीवाले आणि त्यांच्या पथारी उचलण्याचीही गरज आहे. यासाठी विभागाच्या परवाना निरिक्षकाची मानसिकता महत्वाची असते. परंतु फेरीवाल्यांवर तसेच पदपथावरील अतिक्रमणावर कारवाई (BMC Action) करण्यासाठी परवाना निरिक्षक आणि सहायक अभियंता (मेंटनन्स) यांच्यावतीने संयुक्त कारवाई होणे आवश्यक असून प्रत्यक्षात पदपथ अतिक्रमण मुक्त करणे म्हणजे फेरीवाल्यांवर कारवाई करणे आणि त्यांच्यावर मनापासून कारवाई करण्याची इच्छा या दोन्ही पदांवरील अधिकाऱ्यांची नाही. त्यातच ही कारवाई करून सहायक आयुक्तांना आणि पर्यायाने परिमंडळाच्या उपायुक्तांना या श्रेय मिळू नये यासाठी या पदावरील अधिकाऱ्यांकडून या कारवाईत खो घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या स्वप्नातील कारवाईला सहायक आयुक्तांऐवजी सहायक अभियंता अणि परवाना निरिक्षक पदावरील अधिकारीच सुरुंग लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयुक्तांना आता विभागाच्या सहायक अभियंता पदावरील तसेच परवाना निरिक्षक पदावरील अधिकाऱ्यांना दमात घेण्याची गरज असून तेव्हाच या कारवाईला गती मिळण्याची शक्यता महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. (Mumbai Roads )