Senior Citizens Savings Scheme – SCSS : निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळावे त्यासोबतच आयुष्यभराची बचत सुरक्षित राहावी आणि गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळावा, अशी अपेक्षा प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाची असते. अशा वेळेस सरकारची एक योजना फायद्याची ठरू शकते. केंद्र सरकारची पाठिंबा असणारी ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizens Savings Scheme – SCSS) ही सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय योजनांपैकी एक मानली जाते. केंद्र सरकारच्या पाठिंब्यामुळे ही योजना अत्यंत सुरक्षित मानली जाते. याशिवाय, इतर अनेक अल्पबचत योजनांच्या तुलनेत या योजनेत आकर्षक व्याजदर मिळत असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक या योजनेला पसंती देतात.
सरकार प्रत्येक तिमाहीत SCSS सह अल्पबचत योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेते. मार्च 2026 मध्ये झालेल्या आढावा बैठकीत, सरकारने एप्रिल-जून 2026 या तिमाहीसाठी कोणत्याही अल्पबचत योजनेच्या व्याजदरात बदल केला नाही. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत 30 लाख रुपये गुंतवल्यास 8.2 टक्के व्याजदराने दरवर्षी 2.46 लाख पर्यंत नियमित उत्पन्न मिळू शकते. या सरकारी योजनेअंतर्गत व्याज तिमाही दिले जाते.
https://prahaar.in/2026/07/17/family-care-tracker-scheme/
30 लाखांची गुंतवणूक केल्यास किती मिळेल?
जर एखाद्या पात्र ज्येष्ठ नागरिकाने SCSS मध्ये 30 लाख रुपये गुंतवले, तर त्याला 8.2 टक्के वार्षिक व्याजदराने दरवर्षी तब्बल 2 लाख 46 हजार रुपयांचे व्याज मिळू शकते. या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे व्याजाची रक्कम वर्षाअखेरीस न देता प्रत्येक तिमाहीला थेट खात्यात जमा केली जाते. याचा अर्थ, प्रत्येक तीन महिन्यांनी गुंतवणूकदाराच्या खात्यात 61,500 रुपये जमा होतील. वर्षभरात अशा चार हप्त्यांद्वारे एकूण 2 लाख 46 हजार रुपये मिळतात. त्यामुळे निवृत्तीनंतर नियमित मासिक खर्च भागवण्यासाठी ही योजना मोठा आर्थिक आधार ठरू शकते.
पाच वर्षांत किती उत्पन्न मिळेल?
SCSS ची मूळ मुदत 5 वर्षांची आहे. या कालावधीत जर व्याजदरात बदल झाला नाही, तर 30 लाखांच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदाराला जवळपास 12 लाख 30 हजार रुपये व्याज मिळू शकते. यानंतरही खात्याची मुदत आणखी 3 वर्षांसाठी वाढवण्याची सुविधा सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
https://prahaar.in/2026/07/20/stock-market-ipos-and-the-process/
थोडक्यात समजून घेऊ
गुंतवणूक – 30 लाख रुपये
वार्षिक व्याजदर – 8.2 टक्के
प्रत्येक तिमाहीचे व्याज – 61,500 रुपये
वार्षिक व्याज – 2,46,000 रुपये
योजनेची मुदत – 5 वर्षे
SCSS मध्ये किती रक्कम जमा करता येते?
या योजनेत किमान 1,000 रुपये जमा करता येतात. तर कमाल गुंतवणूक मर्यादा 30 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही मर्यादा एखाद्या व्यक्तीच्या सर्व SCSS खात्यांसाठी मिळून लागू होते. पती-पत्नी दोघेही या योजनेसाठी पात्र असतील, तर ते स्वतंत्र किंवा संयुक्त खाते उघडू शकतात. अशा परिस्थितीत दोघेही स्वतंत्रपणे 30-30 लाख रुपये गुंतवू शकतात. जर चुकून कमाल मर्यादेपेक्षा जास्त रक्कम जमा झाली, तर अतिरिक्त रक्कम परत केली जाते. त्या अतिरिक्त रकमेवर पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या दराने व्याज दिले जाते.
कर लाभ काय आहेत ?
SCSS मधून मिळणारे व्याज पूर्णपणे करपात्र आहे. तथापि, ज्येष्ठ नागरिक आयकर कायद्याच्या कलम 80TTB अंतर्गत 50,000 पर्यंतच्या कपातीचा दावा करू शकतात. त्यामुळे कर नियोजन करताना या बाबीचा लाभ घेता येतो.
खाते कधी बंद करता येते ?
SCSS खाते उघडल्यानंतर 5 वर्षे पूर्ण झाल्यावर ते बंद करता येते. जर खात्याची मुदत आणखी तीन वर्षांसाठी वाढवली असेल, तर वाढीव कालावधी संपल्यानंतर खाते बंद करता येते. खातेधारकाचा मृत्यू झाल्यास, खाते अंतिमतः बंद होईपर्यंत त्यावरील रकमेवर पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या दराने व्याज मिळत राहते. या योजनेचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे 5 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर खाते आणखी 3 वर्षांसाठी वाढवता येते. यासाठी मुदतपूर्ती झाल्यानंतर एका वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक असते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दीर्घकाळ सुरक्षित आणि नियमित उत्पन्नाचा लाभ मिळू शकतो.
ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर पर्याय
भांडवलाची सुरक्षितता, केंद्र सरकारची हमी, आकर्षक 8.2 टक्के व्याजदर आणि प्रत्येक तिमाहीला नियमित उत्पन्न या सर्व बाबींचा विचार करता ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ही निवृत्त व्यक्तींसाठी सर्वोत्तम गुंतवणूक पर्यायांपैकी एक मानली जाते. ज्यांना सुरक्षित गुंतवणुकीसोबत नियमित उत्पन्न हवे आहे, त्यांच्यासाठी ही योजना निश्चितच फायदेशीर ठरू शकते.