आशय-वीणा सानेकर
आम्हा सर्व मित्र-मैत्रिणींची मुलं तेव्हा लहान होती. आई-बाबा म्हणून आम्ही चुकत माकत घडत होतो आणि आमची मुलेही घडत होती. एकदा उदय नावाच्या आमच्या मित्राने त्याला आवडलेल्या एका पुस्तकाचा उल्लेख केला. हे पुस्तक म्हणजे डॉ. विजया वाड यांचे आपली मुलं!२००१ साली प्रकाशित झालेले हे पुस्तक. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे निवृत्त संचालक वि. गो. कुलकर्णी यांनी या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत अत्यंत स्पष्ट विधान केले आहे. ते म्हणतात,“शाळा हे मुलांचे बालपण गाडून टाकणारे ठिकाण आहे काय? या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेवरून नजर फिरवताना अतिशय महत्त्वाचे विषय समोर येत गेले. ‘घरचं वातावरण,’ ‘एकुलतं एक,’ ‘शिक्षा आणि पारितोषिक,’ ‘प्रगतिपुस्तक’, ‘संस्कार’, ‘आत्महत्येपासून दूर’, ‘पालक? नव्हे मालक!’, या काही विषयांवरून नजर जरी फिरवली तरी हे पुस्तक अनेक अंगांनी पालकांशी हितगुज करते.
मुलगा आणि मुलगी यांच्यात वेगवेगळ्या घरांमध्ये केला जाणारा भेद दाखवणारा ‘भेदाभेद अमंगळ’ हा लेख या पुस्तकात आहे. स्वयं निर्णयाची ताकद पालकांनीच मुलींमध्ये निर्माण करायला हवी, हे विविध अनुभवांमधून विजया बाईंनी मांडले आहे. बाईंच्या वर्गातली एक मुलगी हुंड्याच्या विषयावरच्या निबंधात लिहिते, की मी हुंडाबळी होण्याचा प्रश्नच येत नाही कारण माझे लग्नच होणार नाही. मुलीचे रूप, तिचा रंग या गोष्टींना समाज किती महत्त्व देतो हे सांगताना बाई एखाद्या रंगाने काळ्या रूपवान नसणे मुलीच्या आईलाच तिची लाज वाटते हे अनुभवाद्वारा व्यक्त करतात.मुलांच्या निकोप वाढीसाठी घरातले वातावरण पूरक असावे लागते, हे सांगताना वाडबाई लिहितात, “ ज्या घरात मोठी जागा आहे पण मनात जागा नाही, त्या घरांना घरपण कुठलं ? मुलं शोधत असतात मनातली जागा! “शाळांतून लैंगिक शिक्षण देणे का गरजेचे आहे आणि नकळत्या वयात केवळ मुले चोरटेपणाने त्यांचे कुतूहल शमवतात आणि यातून गुन्हे घडतात, हे सांगणारा लेख आवर्जून समजून घ्यावा असा आहे.
‘पौगंडावस्थेतील आपला मुलगा किंवा मुलगी सुरवंटाच्या अवस्थेत असते. त्यांच्याशी सहज संवाद साधा. या नात्यातला विश्वास आणि मोकळेपणा म्हणजे विकासाची मनमोकळी संधी !‘पालक नव्हे मालक ! ‘या लेखाचा शेवट कायम माझ्या स्मरणात राहिलेला आहे. “कुठेच डेड एंड नसतो. एका रस्त्याला दुसरा रस्ता फुटतो.”शिक्षक आणि प्राचार्य म्हणून वाड बाईंचा अनुभव प्रदीर्घ आहे. या दीर्घ प्रवासातील प्रसंग प्रत्यक्षात आसपास घडलेले आहेत. या अनुभवांच्या कथा पुस्तकात बोलक्या होतात. ‘जीवन चार गुणांपुरते मर्यादित नाही. एखाद्या जवळ असलेली माणुसकी लाख मोलाची असते’ हे काही विद्यार्थी त्यांच्या वागण्यातून पटवून देतात.मुलांवर कोणतीही लेबले न लावता, ती आहेत तसे त्यांना स्वीकारणे गरजेचे असते.या पुस्तकात शाळेतले, घरातले, समाजातले अनेक अनुभव शब्दबद्ध झालेले आहेत. अतिशय सहज सुंदर संवादात्मक भाषा हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य. कथन करण्याच्या प्रभावी शैलीमुळे हे अनुभव वाचकाच्या मनाला भिडतात. आपल्या अवतीभवती कुठे ही घडू शकतील असे हे अनुभव आपल्या मुलांना वाढवताना सर्व पालकांना उपयुक्त ठरतील यात शंका नाही.शहरातल्या बऱ्याच घरातले पालक आज अर्थार्जनासाठी बाहेर पडतात. श्रीमंत असो वा गरीब प्रत्येक घरात वेगवेगळ्या परिस्थितीत मुले वाढत असतात आणि आहे त्या परिस्थितीत त्यांच्या वाढीसाठी योग्य वातावरण देणे हे त्यांच्या समोरचे मोठे आव्हान आहे. आज त्रिकोणी कुटुंबात तर ते अधिक आहे. अशावेळी आपली मुलं मौल्यवान असल्यामुळे त्यांना जपण्यासाठी ‘आपली मुलं ‘सारखे एखादे पुस्तक हाती हवेच कारण जन्म दिला म्हणून पालक हे मुलांचे मालक ठरत नाहीत. त्यांची भूमिका झाडांची काळजी घेणाऱ्या माळ्याची असायला हवी तरच प्रत्येक मूल स्वतःच्या सुगंधासह बहरते.