– गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठा दिलासा
मुंबई : गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच, मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांसाठी आणि पर्यटकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. येत्या १५ ऑगस्टपासून सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून (Chipi Airport) नवी मुंबईपर्यंत विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबई ते सिंधुदुर्ग (Sindhudurg) असा तब्बल १० ते १२ तासांचा खडतर प्रवास आता अवघ्या १ तासावर येणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली असून, यामुळे सिंधुदुर्गच्या विकासाला अधिक वेग येणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमानसेवा बंद असल्यामुळे चाकरमान्यांना आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. गावी ये-जा करण्यासाठी प्रवाशांना संपूर्णपणे रस्ते किंवा रेल्वे मार्गावरच अवलंबून राहावे लागत होते. मात्र, आता गणेशोत्सवाच्या तोंडावर नवी मुंबई विमानतळावरून चिपीसाठी विमानसेवा सुरू होत असल्याने कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Nitesh Rane)
https://prahaar.in/2026/07/16/isro-scientist-resignations-dos-tightens-exit-rules-for-gaganyaan-key-missions/
पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, “१५ ऑगस्टपूर्वी ‘फ्लाय ९१’ ही विमान कंपनी चिपी ते नवी मुंबई या मार्गावर आपली सेवा सुरू करणार आहे. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच देशातील आघाडीची ‘इंडिगो’ विमान कंपनीची सेवाही या मार्गावर प्रवाशांसाठी उपलब्ध होईल”. सध्या चिपी विमानतळावरून पुणे, हैदराबाद आणि बेंगळुरू या शहरांसाठी शनिवार व रविवार वगळता आठवड्यातील इतर सर्व दिवशी विमानसेवा सुरू आहे. (Nitesh Rane)
https://prahaar.in/2026/07/16/vinayak-raut-arrest-vinayak-raut-anjali-damania/
पर्यटन, उद्योग आणि गुंतवणुकीला मिळणार गती :
नवी मुंबई ते चिपी विमानसेवा सुरू झाल्याने प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे. याचा फायदा स्थानिक नागरिकांसह कोकणात येणारे व्यावसायिक, मोठे गुंतवणूकदार आणि पर्यटकांनाही होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विस्तीर्ण समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आणि निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. आता विमानसेवा सुरू झाल्यामुळे मुंबईकरांना सिंधुदुर्गात पोहोचणे अधिक सोपे व सोयीस्कर होणार असून, यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणालाही मोठी चालना मिळणार आहे. (Nitesh Rane)