Home साप्ताहिक रिलॅक्स आसमंताच्या रंगमंचावरचे ‘आषाढ नाट्य’

आसमंताच्या रंगमंचावरचे ‘आषाढ नाट्य’

0
आसमंताच्या रंगमंचावरचे ‘आषाढ नाट्य’

राजरंग-राज चिंचणकर

आषाढ महिन्याची चाहूल लागली की कवी कुलगुरू कालिदासाने ‘मेघदूत’ या महाकाव्यात वर्णन केलेल्या ‘आषाढस्य प्रथम दिवसें’ची हटकून याद येते. यंदा हा दिवस येत्या आठवड्यात १५ तारखेला आहे आणि त्यायोगे ‘कालिदास’ व ‘मेघदूत’ यांचे मनात रुंजी घालणे स्वाभाविकच आहे. कालिदासाला ‘महाकवी’ म्हणून अधिकतर संबोधले जात असले, तरी त्याने महत्त्वाची नाटकेही प्रसवली आहेत. कालिदासाने ‘मालविकाग्निमित्र’, ‘विक्रमोर्वशीय’ व ‘शाकुंतल’ ही नाटके; तर ‘मेघदूत’, ‘कुमार संभव’, ‘रघुवंश’ आदी महाकाव्ये लिहिली. त्याचे ‘शाकुंतल’ हे नाटक विश्वातल्या उत्तम नाटकांत स्थान मिळवून आहे.

‘मेघदूत’ या महाकाव्याने तर अनेकांवर मोहिनी घातली. ‘मेघदूत’ हे जरी काव्य असले तरी त्यात नाट्य भरून राहिले आहे. याच ‘मेघदूत’मध्ये, आषाढाच्या पहिल्या दिवशी प्रियतमेला मेघाकरवी सांगावा धाडण्याची केलेली कल्पना, ही केवळ कविकल्पना नसून ही घटना म्हणजे कालिदासाच्या प्रत्यक्ष जीवनातला अनुभव असावा, असेही म्हटले जाते. ‘मेघदूत’ हे महाकाव्य असले तरी त्यात चितारलेला आषाढाचा प्रथम दिवस हा कुठल्याही नाट्यापासून वेगळा नाही. काव्यात्म नाट्याचे रंगलेपन ‘मेघदूत’मधल्या प्रथम दिवसाच्या वर्णनात आढळून येते. महाकवी कालिदासाने आभाळातल्या मेघाकडे संदेशवहन करण्याचे कार्य सोपवले आणि त्यातून ‘मेघदूत’ हे अजरामर काव्य निर्माण झाले. वेगळ्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहिले तर त्यातून नाट्यही प्रसवले गेल्याचे लक्षात येते. आसमंताच्या रंगमंचावरचे हे ‘आषाढ नाट्य’च म्हणावे लागेल.

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी सन १९६० या वर्षी त्यांच्या ‘मराठा’मध्ये ‘आषाढस्य प्रथम दिवसें’च्या निमित्ताने एक लेख लिहिला होता. त्यात महाकवी कालिदासाविषयी नाट्याच्या संदर्भात लिहिताना आचार्य अत्रे म्हणतात, “कालिदास हा श्रृंगाराचा सम्राट आहे. स्त्री-पुरुषांच्या अंत:करणाचे सूक्ष्म व्यापार कोमल कौशल्याने चित्रित करण्याची त्याने कमाल केली आहे. तथापि, पुरुषांपेक्षाही स्त्री हृदयातील प्रणयाच्या लपंडावाचे त्याला जेवढे आकलन आहे, तेवढे शेक्सपिअरलादेखील नसेल. श्रृंगाराच्या गगनात एवढ्या उत्तुंग भराऱ्या मारूनही कालिदासाने भारतीय संस्कृतीच्या मर्यादा ओलांडल्या नाहीत. किंबहुना कन्या, पत्नी आणि माता या तीन उदात्त अवस्थेतच स्त्री-जीवनाचे साफल्य आहे, हे दाखविण्यासाठी त्याने ‘अभिज्ञानशाकुंतल’ हे अमर नाट्य लिहिले”. एकूणच, धुंद झालेला आसमंत, आकाशात गडद मेघांची झालेली दाटी, अशा स्थितीत दूरदेशी राहिलेल्या प्रेयसीच्या आठवणीने व्याकूळ होणारा आणि तिचा विरह सहन करणारा प्रियकर; अशा पद्धतीने निसर्गाच्या पटावर रंगणारा आषाढ मासाचा पहिला दिवस, हे वर्णन नाट्यनिर्मितीसाठी अगदीच पोषक म्हणायला हवे. रंगमंचीय अवकाशाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, या काव्यात वर्णन केलेल्या आषाढाच्या पहिल्या दिवसात नाट्यमयता पुरेपूर रंगलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here