Jalgaon : अकोला येथे सहनिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले आणि मूळचे जळगावचे रहिवासी किरण चौधरी यांचा प्रताप भल्याभल्यांना घाम फोडणारा आहे. १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) कारवाईनंतर चौधरी यांच्या जळगावातील घरातून जवळपास तीन कोटी रुपयांची रोकड, सोने-चांदी (Gold and Silver) आणि मालमत्तेशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.
आधीच हे दोन प्रकरण अंगाशी आलेले असताना आता चौधरी आणखी अडचणीत आले आहे. स्वतःच्या सीलबंद घरातील पुरावे नष्ट करण्यासाठी नातेवाईकांना घरफोडीस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात जळगावच्या जिल्हापेठ पोलिसांनी किरण चौधरी (Kiran Chaudhary) यांना अकोला येथून ताब्यात घेतल्यानंतर शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले. यावेळी त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली.
https://prahaar.in/2026/07/11/india-is-not-just-a-market-but-a-launchpad-for-global-development-pm-modi/
नेमकं प्रकरण काय ?
काही दिवसांपूर्वी अकोला येथे १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा गुन्हा किरण चौधरी यांच्याविरुद्ध दाखल झाला होता. या कारवाईनंतर एसीबीने त्यांच्या जळगाव येथील घरावर छापा टाकत घर सील केले होते. मात्र, चौधरी यांच्या आर्थिक व्यवहारांचा आणि मालमत्तेचा तपास सुरू असतानाच सीलबंद घरात घुसून तेथील महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली. चौधरी यांच्या दोन नातेवाईकांनी सीलबंद घरात प्रवेश करून तेथील काही साहित्य आणि कागदपत्रे हलविण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने जिल्हापेठ पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांनाही रंगेहाथ ताब्यात घेतले. या घटनेनंतर पोलिसांनी पुन्हा घर सील करून तेथे कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला.
https://prahaar.in/2026/07/11/jalgaon-a-dramatic-turn-in-the-love-affair/
घरातून दीड कोटींहून अधिकची रक्कम जमा
या प्रकरणाच्या तपासादरम्यान एसीबीच्या नाशिक आणि जळगाव येथील विशेष पथकाने न्यायालयीन प्रक्रियेचे पालन करत चौधरी यांचे जळगावातील सीलबंद घर ‘इन-कॅमेरा’ उघडून सखोल झडती घेतली. या झडतीत त्यांच्या घरातून तब्बल १ कोटी ५३ लाख ८४ हजार ६३० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. त्याशिवाय ६० लाख ५७ हजार १३५ रुपये किमतीचे ४२२ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३१ हजार ४१६ रुपये किमतीचे चांदीचे दागिने, ६२ लाख १३ हजार ३७६ रुपये किमतीची स्वतःच्या तसेच नातेवाईकांच्या नावावरील मालमत्तेची कागदपत्रे, ११ लाख ५२ हजार ७४५ रुपये किमतीच्या सोने खरेदीच्या पावत्या आणि ६ लाख २५ हजार ५४५ रुपये किमतीच्या घरगुती वस्तू जप्त करण्यात आल्या. अशा प्रकारे एकूण २ कोटी ९४ लाख ६४ हजार ८४७ रुपयांचा मुद्देमाल एसीबीने हस्तगत केला.
https://prahaar.in/2026/07/11/railway-mega-block-mega-block-on-central-and-harbour-railway-lines-this-sunday-which-local-trains-are-cancelled-check-the-full-schedule/
एक दिवसाची पोलीस कोठडी
दरम्यान, सीलबंद घरात घुसण्याचा कट रचण्यात किरण चौधरी यांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. स्वतःच्या घरातील जप्तीची कारवाई निष्प्रभ ठरावी, पुरावे नष्ट व्हावेत किंवा महत्त्वाचा ऐवज बाहेर काढता यावा, या उद्देशाने त्यांनी नातेवाईकांना घरफोडीस प्रवृत्त केल्याचा आरोप तपासातून समोर आला आहे. या संशयाच्या आधारे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अकोला येथून ताब्यात घेतले. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने किरण चौधरी (Kiran Chaudhary) यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.