Home ब्रेकिंग न्यूज Actor Prashant Damle : अभिनेते प्रशांत दामले यांच्यावर महापालिकेने सोपवली नवीन जबाबदारी

Actor Prashant Damle : अभिनेते प्रशांत दामले यांच्यावर महापालिकेने सोपवली नवीन जबाबदारी

1
Actor Prashant Damle : अभिनेते प्रशांत दामले यांच्यावर महापालिकेने सोपवली नवीन जबाबदारी
Prashant Damle

‘बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठान’ च्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदी नियुक्ती

मुंबई : मराठी रंगभूमीवरील अष्टपैलू अभिनेते, गायक, निर्माते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत पुरुषोत्तम दामले यांची ‘बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठान’ च्या व्यवस्थापकीय विश्वस्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. हे पद मागील अनेक वर्षांपासून रिक्त आहे. या पदावर पूर्वी चित्रपट अभिनेते व उबाठा शिवसेनेचे नेते आदेश बांदेकर यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्यावर आरोपही झाले होते आणि त्यानंतर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता.

मुंबईच्या महापौर (Mumbai’s Mayor) तथा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष रितू राजेश तावडे (Ritu Tawde) यांच्या हस्ते प्रशांत दामले (Prashant Damle) यांना १० जुलै २०२६ रोजी नियुक्ती पत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापौर दालनात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमास उपमहापौर संजय घाडी, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

https://prahaar.in/2026/07/11/bmc-news-mayor-and-commissioner-should-work-like-superwomen/

प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाच्या नुकत्याच झालेल्या सभेत दामले यांच्या नियुक्तीच्या निर्णयास सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. त्यानुसार नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे. तसेच महापालिका सभागृहातही याची अधिकृत घोषणा झाली. आदेश बांदेकर यांच्या काळातील अनेक गैरप्रकाराबाबत भाजपचे किरीट सोमय्या तसेच प्रकाश गंगाधरे यांनी आरोप केले होते. तसेच काही दिवसांपूर्वी मुलुंड कालिदास नाट्यगृह परिसरातील काही अनधिकृत बांधकामेही तोडण्यात आली होती. महापौरांच्या निर्देशानंतर प्रशासनाने ही कारवाई केली होती.

प्रशांत दामले यांचा संक्षिप्त परिचय – शाळकरी वयातील गाण्यापासून जागतिक विक्रमांपर्यंतचा प्रवास

मूळचे मुंबईकर असलेल्या प्रशांत दामले यांना शालेय जीवनापासूनच गाण्याची प्रचंड आवड होती. पुढे महाविद्यालयीन जीवनात त्यांच्यात अभिनयाची आणि नाटकांची आवड निर्माण झाली. त्यांनी १९७८ ते १९८३ या काळात समांतर रंगभूमीवर काम करून आपल्या अभिनयाचा पाया मजबूत केला. १९८३ मध्ये आलेल्या ‘टूरटूर’ या पहिल्या व्यावसायिक नाटकाने त्यांच्या कारकीर्दीला खऱ्या अर्थाने कलाटणी दिली. त्यानंतर दामले यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. आजवरच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी तब्बल ३६ विविध नाटकांमधून १३,५३८ पेक्षा अधिक प्रयोगांचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांच्या या कामगिरीची नोंद घेत ४ लिमका बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये त्यांचे नाव कोरले गेले आहे.

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि सन्मान

प्रशांत दामले यांनी केवळ अभिनेता म्हणूनच नाही, तर एक उत्तम गायक, सूत्रसंचालक आणि निर्माता म्हणूनही आपली छाप उमटवली आहे. त्यांच्या कलाक्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना केंद्र शासनाचा मानाचा ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले आहे. मागील तीन वर्षे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून ते धुरा सांभाळत आहेत. सामाजिक क्षेत्रातही ते अग्रेसर असतात.

https://prahaar.in/2026/07/11/moshi-building-collapse-update-on-the-moshi-incident-rescue-operation-accelerated-to-reach-those-trapped/

नवी जबाबदारी आणि विश्वास

बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदाची धुरा आता श्री. प्रशांत दामले यांच्यासारख्या अनुभवी, अभ्यासू आणि लोकप्रिय कलावंताकडे सोपवण्यात आली आहे. दामले यांच्या या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत, त्यांच्या अनुभवाचा फायदा प्रतिष्ठानच्या पुढील वाटचालीस निश्चित होईल, असा विश्वास प्रतिष्ठानच्या अध्यक्ष तथा महापौर रितू तावडे यांच्यासह उपमहापौर संजय घाडी, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिवसेना गटनेते अमेय घोले यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य यांनी व्यक्त केला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here