Nashik : राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून, शिवसेना ठाकरे गटासाठी नाशिकमधून मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. काही आमदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याच्या चर्चांदरम्यान आता नाशिक महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे अनेक नगरसेवकही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
नाशिक महापालिकेत भाजप आणि शिवसेनेची सत्ता आहे. विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विकासनिधी मिळविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याची चर्चा आहे. हीच बाब केंद्रस्थानी ठेवून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाकरे गटाच्या १५ पैकी १० ते १२ नगरसेवकांशी संपर्क साधल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे हे लोकप्रतिनिधी लवकरच शिंदे गटात प्रवेश करू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
https://prahaar.in/2026/07/10/nashik-news-outrageous-incident-at-a-nashik-ashram-school/
यासंदर्भात शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांसोबत संबंधित नगरसेवकांची बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या बैठकीला किंवा संभाव्य पक्षप्रवेशाला अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. दरम्यान, संबंधित नगरसेवकांना त्यांच्या प्रभागांच्या विकासासाठी प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा विशेष निधी दिला जाणार असल्याचीही चर्चा आहे. या संपूर्ण राजकीय हालचालीला काही वर्तुळांत ‘ऑपरेशन टायगर’ असे नाव दिले जात असल्याचे बोलले जात आहे. या घडामोडींमुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, चर्चेचे प्रत्यक्ष पक्षप्रवेशात रूपांतर होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.