Home ब्रेकिंग न्यूज Alandi Flood : पूरग्रस्त आळंदीसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय

Alandi Flood : पूरग्रस्त आळंदीसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय

0
Alandi Flood : पूरग्रस्त आळंदीसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय

– विविध विकास कामांसाठी एकूण १० कोटींचा विशेष निधी मंजूर!

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि आलेल्या महापुरामुळे श्रीक्षेत्र आळंदी येथील नागरी व पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, तेथील पायाभूत सुविधांच्या पुर्नउभारणीसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने १० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. ही सर्व विकासकामे तातडीने आणि युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांना दिले आहेत. (Alandi Flood)

आगामी आषाढी एकादशीच्या पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी आणि भाविक आळंदीत दाखल होत आहेत. परंतु, मुसळधार पावसामुळे व पुरामुळे या भाविकांसाठी उभारण्यात आलेली तात्पुरती शौचालये वाहून गेली आहेत. तसेच आळंदी येथील जलशुद्धीकरण केंद्र पाण्याखाली गेले असून, पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणचे पथदिवे कोसळले असून बहुतांश भागातील रस्ते उखडले आहेत, तर नदीवरचे संरक्षक कठडेसुद्धा काही ठिकाणी तुटले आहेत. यामुळे आळंदीत दाखल होणाऱ्या भाविकांची व स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. (Alandi Flood)

https://prahaar.in/2026/07/07/tukaram-maharaj-palkhi-sohala-2026-pimpri-chinchwad-is-all-set-to-welcome-the-palkhis-of-tukobaray-and-mauli/

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील आळंदीतील भाविकांना होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसुध्दा मंगळवारी दुपारी आळंदी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी थेट दूरध्वनीवरून चर्चा करून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. तसेच, आळंदीत पोहोचलेल्या वारकऱ्यांशीदेखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधून त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. (Alandi Flood)

या महत्त्वाच्या चर्चेनंतर आळंदी येथील अत्यावश्यक कामांसाठी नगरविकास विभागाने तातडीने १० कोटी रुपये मंजूर केले असून, अवघ्या काही तासांत यासंबंधीचा शासन निर्णय (GR) सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने प्रत्यक्ष कामांना सुरुवातही केली आहे.

या मंजूर १० कोटी रुपयांपैकी ५ कोटी रुपयांचा निधी “वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठीच्या विशेष अनुदानातून” दिला जाणार आहे. याअंतर्गत आळंदी नगरपरिषद क्षेत्रातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्था व इतर अत्यावश्यक कामांसाठी ३ कोटी रुपये, नवीन पथदिवे आणि पोल उभारणीसाठी १ कोटी रुपये, तसेच भाविकांच्या आरोग्यासाठी शौचालय व स्वच्छतागृह उभारणीसाठी १ कोटी रुपये खर्च केले जातील. यासोबतच, पूरग्रस्त भागातील रस्ते आणि पुलांची तातडीने दुरुस्ती व्हावी यासाठी “विशेष रस्ता अनुदान” योजनेअंतर्गत अतिरिक्त ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यामधून नगरपरिषद हद्दीतील पूल, रस्ते आणि त्यांच्या लगतच्या गटारांची कामे केली जाणार आहेत. (Alandi Flood)

https://prahaar.in/2026/07/06/torrential-rain-causes-major-flooding-in-the-indrayani-river-all-four-lakes-feeding-towards-alandi-are-overflowing/

आषाढी वारीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य शासनाने घेतलेल्या या १० कोटींच्या तातडीच्या निर्णयामुळे आळंदीतील पूरग्रस्तांना आणि वारकरी भाविकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here