मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात (Private Hospital) दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडी, सातत्यपूर्ण दौरे आणि कामाचा अतिताण यामुळे त्यांना ताप आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने हा निर्णय घेण्यात आला. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शुक्रवारी विधिमंडळाचे कामकाज सुरू असतानाच उपमुख्यमंत्री (DCM) शिंदे यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यातच, धुळ्यातील उबाठा गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांचा जाहीर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम ठाण्यातील गंगुबाई शिंदे सभागृहात नियोजित होता. मात्र, प्रकृती अधिकच बिघडल्याने उपमुख्यमंत्र्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम तातडीने रद्द करण्यात आले आणि ते उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले.
https://prahaar.in/2026/07/04/uday-samant-nashik-ring-road-protest-suspended-meeting-with-farmers-scheduled-following-minister-uday-samants-intervention/
गेल्या काही दिवसांत राज्यातील राजकीय वर्तुळात वेगवान घडामोडी घडल्या आहेत. शिवसेनेने ‘ऑपरेशन टायगर’च्या (Operation Tiger) माध्यमातून उबाठा गटाच्या ६ खासदारांनंतर आमदार सचिन अहिर यांना पक्षात प्रवेश दिला. या पार्श्वभूमीवर व्यूहरचनेसाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांना लागोपाठ दिल्ली वाऱ्या कराव्या लागल्या होत्या. अधिवेशन आणि राजकीय गाठीभेटी अशा दुहेरी पातळीवरील प्रचंड दगदगीचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाल्याचे बोलले जाते.
मध्यरात्री २ वाजता पक्षप्रवेश
उपमुख्यमंत्री रुग्णालयात दाखल झाल्याने शुभांगी पाटील यांचा पक्षप्रवेश सोहळा लांबणीवर पडला होता. मात्र, राजकीय गणिते आणि मुहूर्त न दवडता, अखेर शुक्रवारी मध्यरात्री २ वाजता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात हा पक्षप्रवेश पार पडला. नाशिक पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवत सुमारे ५० हजार मते घेणाऱ्या शुभांगी पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.