Home साप्ताहिक रिलॅक्स अथेन्समधे घडलेली हुबेहुब जुगलबंदी

अथेन्समधे घडलेली हुबेहुब जुगलबंदी

0
अथेन्समधे घडलेली हुबेहुब जुगलबंदी

भालचंद्र कुबल-पाचवा वेद

 

तुम्हाला सिनिक तत्त्वज्ञानाबाबत माहितेय का? मला नव्हती, म्हणून मी ती आॅनलाईन शोधली. का ? तर डॉ. सोमनाथ सोनवळकर यांचे अलेक्झांडर व्हाया डायोजेनिस या दीर्घांकाबद्दल नाट्यरसिकांचा बघण्याचा परस्पेक्टीव्ह बदलावा. डायोजेनिस (दियोजीनिस)बद्दल माहिती काढायला गेलो आणि त्या विषयाची जी माहिती समोर आली ती त्यातून केवळ दीर्घांकच नाही तर एक फुल-लेंग्थ (पूर्णाकृती)सुद्धा नाटक सहज तयार होईल. डॉक्टर सोमनाथ हा आमच्या सारख्या नाट्यनिरीक्षकांना, मर्यादित का होईना संशोधन करूनच आपल्या नाटकावर लिहायला भाग पाडतो, हा माझा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या नाटकांवर लिहिताना थोडं जास्तच सजगपणे लिहावं लागतं. मला कधी कधी आश्चर्य वाटतं ते राज्यनाट्य स्पर्धेतील परीक्षकांचं…! डॉ. सोमनाथांच्या नाटकांची कारकीर्द आजवर स्पर्धात्मक हौशी रंगभूमीवर अधिक खुलून आली. बहुतांशी त्यांची नाटके त्यांनीच दिग्दर्शित केली. त्यांच्या नाटकात व्यावसायिक बनचुकेपणा नसल्याने आजवर व्यावसायिक रंगभूमीवर त्यांच्या नाटकांचे यशस्वी पदार्पण झालेले नाही. आधी उल्लेखिल्याप्रमाणे राज्यनाट्य स्पर्धेतील परीक्षकांची अशा जड जड आशयच्या नाटकांचे परीक्षण करताना त्यांच्या नाटकांचे भवितव्य केवळ अशक्यप्राय केलेअसणार किंवा या अगोदर निकालांना अनुसरून निश्चितच कठोर परिणामांना सामोरं जावं लागलं असणार. असो. तर सिनिक तत्त्वज्ञान हे डायोजेनिस या तत्ववेत्त्या भोवती फिरते. ऐश्वर्य, दिखाऊपण आणि विलासाचा त्याग करणे हे आत्मनियंत्रण व मुक्तीचे साधन या अर्थाने सिनिक मानले गेले. डायोजेनीस तुटक्या गोलाकार घड्यात राहत असल्याचे वर्णन हे त्याचं जीवनप्रमाण सिद्ध करणारं आहे. एखाद्याने स्वतःवर अवलंबून राहिल्याने खरे स्वातंत्र्य मिळते. मालमत्ता किंवा पदांनी माणसाला नियंत्रित केलं जातं. मानवी नैसर्गिक गरजांनुसार, समाजाने बनविलेल्या नियमांनुसार नव्हे तर मानवाच्या साध्या साध्या गरजा ओळखून त्या पुरवायला हव्यात. दार्शनिक विचार मांडताना डायोजेनीसने प्रचंड कटाक्षाने काही प्रात्यक्षिके वापरली. त्यातून समाजातील बनावट, कपटीपणा आणि स्वार्थ उघड केला. नैतिकता ही बाह्य प्रतिष्ठा किंवा कायद्यापेक्षा वरची असावी; प्रत्येकाने स्वतः विचार करून जगायला हवे. इत्यादी मुद्दे सिनिक तत्त्वज्ञानात नमूद केले आहेत. आता प्रश्न उरतो अलेक्झांडर आणि डायोजेनिसच्या भेटीचा…!

अलेक्झांडर आणि डियोजेनिस एकमेकांना भेटल्याचे संदर्भ इतिहासात नमूद केलेले असल्याने, दोन परस्पर विरोधी व्यक्तिरेखा समोरासमोर भेटल्याने त्या एकमेकांशी वैचारिकदृष्ट्या, तात्त्विकदृष्ट्या आणि भावनिक दृष्टिकोनातून काय भाष्य करतील? याचा लेखाजोखा म्हणजेच हे नाटक आहे. सामाजिक मूल्ये अधोरेखित करणारा हा एक “सिंबलिक मुकाबला” आहे. जग जिंकल्यामुळे प्राप्त झालेली किंवा होऊ घातलेली महानता आणि एका साध्या जीवनाच्या आनंदाने मिळणारे समाधान अशी दोन वेगवेगळी मूल्ये दाखवते. डायोजेनीसने उच्चारलेलं एक वाक्य दोघांच्याही प्रतिष्ठेच्या तुलनेत व्यक्तिगत स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित करते. हा प्रसंग प्राचीन लेखकांनी अनेक तपशिलांसह लिहून ठेवला आहे. प्लुटार्थ या लेखकाने “जरी मी अलेक्झांडर नसलो तरीही मला डायोजेनीसच व्हायला आवडेल” असे म्हटल्याचा संदर्भ देखील आढळतो. थोडक्यात डायोजेनीसच्या प्रभावाचा किंवा सिनिक तत्त्वज्ञानावर बेतलेले हे तात्त्विक संघर्ष नाट्य तुम्हाला दीड पावणेदोन तास घट्ट पकडून ठेवते.

प्रायोगिक अंगाने न जाता वास्तववादी रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य, संगीत आणि प्रकाशयोजनेचा खेळ अथेन्समधली जीवनशैली दाखवून देते. त्यातील साम्य पकडण्यात अनुक्रमे उल्लेश खंदारे, ग्रेगरी फर्नांडिस, अरुण राधायण, महेंद्र मांजरेकर आणि शाम चव्हाण खणखणीत यशस्वी झाले आहेत. फक्त एका संदर्भात ही भेट समुद्रकिनारी घडली आहे असे नमूद आहे. तसे नेपथ्य करता संगीत आणि प्रकाश योजनेला अधिक उभारी मिळाली असती का? हा एक सहज प्रश्न मनात येऊन गेला. जे दृष्यात्मकरीत्या चांगले आहे ते अजूनही चांगले वाटावे यासाठी तसे वाटणे शक्य आहे. अभिनयाबाबत नोंद घ्यायची झाल्यास कलाकारांनी आपल्या अभिनय क्षमतेवर पेलून धरलेलं अत्यंत ‘जड’ नाटक म्हणावं लागेल. डॉ. सोमनाथ सोनवळकर आणि अरुण राधायण यांची अभिनय जुगलबंदी म्हणजे बऱ्याच काळानंतर रंगमंचावर अवतरलेला संघर्षाविष्कार खरोखर पाहाण्यासारखा आहे. आणि त्यास साथ मिळाली आहे विनय कांबळे आणि ग्रेगरी फर्नांडिस यांची…!

डायोजेनिस म्हणे अत्यंत सुदृढ शैलीचा प्रहसनकार होता. आपली साधी सोपी तत्त्वे त्याने लिहून ठेवलेल्या स्किट्सद्वारा जगासमोर आणली. तो त्या छोटेखानी स्किट्समधून इसापनीती सारखे किस्से प्रहसनातून दाखवून द्यायचा जे लोकांच्या पचनी पडत असत आणि ते डायोजेनिसचे अनुयायी बनत. परवा या नाटकाच्या प्रयोगाला प्रेमानं गज्वी यांची उपस्थिती होती. राहून राहून त्यांना विचारावंसं वाटंत होतं, “आंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्त्विक व्यतिरिक्त सर, तुम्ही शोधलेल्या तात्त्विक नाट्यप्रकारापैकी हे नाटक ठरू शकेल का?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here