Home संपादकीय जनसंवाद

जनसंवाद

0
जनसंवाद

नाट्यसृष्टीतील दीपस्तंभ

नाट्य विश्वात त्यांना सारे आदराने बाई म्हणूनच ओळखत, अशा मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ, श्रेष्ठ दिग्दर्शिका विजयाबाई मेहता यांच्या निधनाने नाट्यविश्वाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी मराठी रंगभूमीला आधुनिक सौंदर्यदृष्टी आणि वैचारिक समृद्धी दिली. हमिदाबाईची कोठी, वाडा चिरेबंदी, पुरुष, बॅरिस्टर नावं तरी किती घ्यायची? नव्हे त्यांनी दिग्दर्शन केलेल्या अनेक नाटकांना अजरामर स्थान मिळाले. अनेक गुणी कलाकार त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडले. नाटक हे समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले. सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी रंगभूमीची अविरत सेवा केली. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे. जिथे जिथे थिएटरच्या नाटकाचा पडदा उघडेल तेव्हा प्रथम याद येईल ती बाईंचीच. त्यांच्या कलाक्षेत्रातील कार्याला विनम्र नम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली.- विश्वनाथ पंडित, ठाणे

‘बहावा’चे नवे रूप!

वैशाख वणव्यात निष्पर्ण होऊन पिवळ्या धम्मक सोनसळी पुष्पांच्या झुपक्यांनी बहरलेला बहावा (अमलताश) जणू हळदीने माखलेल्या नवरीसारखाच भासत होता! आता मात्र ऋतूपालट होताच त्यांने नवे रूप धारण केले आहे. निष्पर्ण होऊन पिवळ्या धम्मक पुष्प झुपक्यांनी बहरलेला बहावा आता फिकट हिरव्या पानांनी गच्च बहरला आहे! कुठे कुठे तर पानांच्या दाटीतून पिवळ्या जर्द फुलांच्या झुपक्यांमुळे बहावा अधिकच खुलून दिसू लागला आहे! खरेच कुदरती करिष्म्याचे कितीतरी रंग आणि ढंग आहेत.- श्रीकांत मा. जाधव, सातारा

आळंदीच्या मंदिराचा कळस

महाराष्ट्राच्या आध्यात्मिक नकाशावर ‘आषाढी वारी’ ही एक अशी घटना आहे, जिथे लाखोंच्या संख्येने भक्त विठुरायाच्या भेटीसाठी नतमस्तक होतात. या वारीची सुरुवात होते ती आळंदीच्या संजीवन समाधी मंदिरातून. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होताना जे वातावरण असते, ते केवळ शब्दबद्ध करण्यापलीकडचे असते. वारकरी परंपरेत अशी श्रद्धा आहे की, जोपर्यंत माऊलींच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन होत नाही, तोपर्यंत वारीची पूर्णता होत नाही. अनेकांच्या मनात प्रश्न येतो की, कळस खरोखरच हलतो का? धार्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, हे एक गूढ आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. वारकऱ्यांची अशी दृढ भावना आहे की, जेव्हा पालखी सोहळा सुरू होतो, तेव्हा माऊलींना निरोप देण्यासाठी आणि आपल्या भक्तजनांना आशीर्वाद देण्यासाठी खुद्द देवच कळसाच्या रूपाने उपस्थित राहतात. वारकऱ्यांसाठी हा अनुभव वैज्ञानिक नसून तो ‘अनुभूती’चा आहे. त्यांना तो कळस हलताना दिसणे, म्हणजे माऊलींनी पुढील प्रवासासाठी दिलेली परवानगी आणि आशीर्वादच वाटतो. आळंदीचा मंदिराचा कळस आणि वारी यांचा संबंध माणुसकी, प्रेम आणि भक्तीचा आहे. ज्या भावनेने लाखो वारकरी आपल्या माऊलीला निरोप देतात. ही परंपरा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे आणि ती पिढ्यानपिढ्या अशीच जिवंत राहील. आजही जेव्हा पालखी सोहळा सुरू होतो, तेव्हा आळंदीच्या आकाशात घुमणारा ‘माऊली’चा गजर हेच सांगून जातो की, भक्तीच्या प्रवासात तर्कापेक्षा श्रद्धेची ओढ केव्हाही श्रेष्ठ असते.- सौ. वर्षा आवदे, नागपूर

रद्द करण्यापेक्षा विलीनीकरण योग्य !

राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिले ते दहावी मराठी भाषा शिकविणे बंधनकारक आहे. त्याचे योग्य प्रकारे पालन न झाल्यास शाळांवर एक लाख रुपये दंड आकारण्यात येईल, तरीसुद्धा नियमांचे पालन न करणाऱ्या शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्र्यांनी घोषित केले. खरे तर अशा शाळांवर केवळ एक लाख रुपये दंड अत्यंत मामुली आहे. तो भरभक्कम करणे अधिक योग्य ठरेल. मात्र शाळेची मान्यता रद्द करून मुलांचे, शिक्षक, सेवक वर्ग यांचे नुकसान करण्यापेक्षा शासकीय, शैक्षणिक नियम काटेकोरपणे पाळणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये मान्यता रद्द होणाऱ्या शाळांचे विलीनीकरण करणे अधिक योग्य ठरेल. यामुळे कुणाचेच नुकसान होणार नाही. दंड आणि मान्यता रद्द होण्याच्या पायरीपर्यंत राज्यातील कोणतीच शाळा जाणार नाही अशी अपेक्षा करूया.- विश्वनाथ पंडित, ठाणे

पारंपरिक अभ्यासक्रमांकडे पाठ

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षणावरील अखिल भारतीय सर्वेक्षणच्या (आयश) अहवालानुसार महाराष्ट्रातील पारंपरिक अकृषिक शासकीय विद्यापीठांच्या पारंपरिक अभ्यासक्रमांमधील प्रवेश ३२ ते ३५ टक्क्यांनी घटल्याचे समोर आले आहे. विशेषतः मराठी, हिंदी, इंग्रजी यांसारख्या भाषा आणि इतिहास, समाजशास्त्र यांसारख्या मानव्यविद्या इत्यादी शाखांमधील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र यांसारख्या मूलभूत विज्ञान शाखांकडेही विद्यार्थी पाठ फिरवत आहेत. अपेक्षेप्रमाणेच रोजगारांच्या संधी अधिक असल्यामुळे आजच्या पिढीचा कल आधुनिक तंत्रज्ञान, संगणक विज्ञान आणि व्यावसायिक कोर्सेसकडे अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे. वास्तविक तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल असणे ही काळाची गरज असली तरी भाषा, इतिहास आणि मूलभूत विज्ञान हे अभ्यासक्रमही तितकेच महत्त्वाचे आहेत. कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेत भविष्य नाही, हा पालकांचा भ्रम आणि गैरसमज दूर करणेही आवश्यक आहे. कारण आजही या शाखांमधील विद्यार्थ्यांना आयएएससारख्या नागरी सेवा, पत्रकारिता, अर्थशास्त्र तसेच कॉर्पोरेट क्षेत्रात भाषातज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ म्हणून करिअरची मोठी संधी मिळू शकते.- प्रदीप अनुसया शंकर मोरे, मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here