Trimbakeshwar : गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या त्र्यंबकेश्वरकरांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. शनिवारी दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावत संपूर्ण परिसराला झोडपून काढले. जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारल्याने चिंतेत असलेल्या शेतकरी आणि नागरिकांमध्ये या पावसामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
https://prahaar.in/2026/06/20/return-of-the-monsoon-rain-intensity-set-to-increase-across-maharashtra/
नागरिकांना मोठा दिलासा
यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने पेरण्यांचे नियोजन रखडले होते. पावसाअभावी बळीराजा हवालदिल झाला होता. मात्र दुपारनंतर अचानक आभाळ दाटून आले आणि काही क्षणांतच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
https://prahaar.in/2026/06/20/the-temples-assembly-hall-collapsed-and-everything-was-reduced-to-ruins-a-detailed-report-on-the-shocking-incident/
पावसाचे पाणी साठवण्यासाठी महिलांची लगबग
त्र्यंबकेश्वर शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. पिण्याचे आणि घरगुती वापराचे पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पाऊस सुरू होताच अनेक महिलांनी घराबाहेर धाव घेत छतावरून वाहणारे पावसाचे पाणी ड्रम, बादल्या आणि विविध भांड्यांमध्ये साठवण्यास सुरुवात केली.
हा पाऊस पुढील काही दिवस कायम राहिला तर पाणीटंचाईची तीव्रता काही प्रमाणात कमी होईल, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे, मृगाच्या या पहिल्या दमदार सरीमुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून खरीप हंगामासाठी सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.