बर्मिंगहॅम : अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माच्या फिरकीची जादू आणि उपकर्णधार स्मृती मानधनाच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला संघाने आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. भारताने आपल्या पहिल्याच सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ६४ धावांनी दारूण पराभव केला. भारताने विजयासाठी दिलेल्या १७१ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव अवघ्या १७ षटकांत १०६ धावांवर गडगडला. या दणदणीत विजयामुळे भारतीय संघाने गुणतालिकेत मोलाचे २ गुण मिळवले आहेत.
https://prahaar.in/2026/06/14/commonwealth-games-indian-athletics-squad-announced-for-the-commonwealth-games/
एजबॅस्टन मैदानावर झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकांत ६ बाद १७० धावांची विशाल धावसंख्या उभारली. शफाली वर्मा (६ धावा) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (१ धाव) या आघाडीच्या फलंदाज स्वस्तात बाद झाल्यामुळे भारताची सुरुवात खराब झाली होती. या कठीण प्रसंगात उपकर्णधार स्मृती मानधनाने मैदानाबाहेर चौफेर फटकेबाजी करत ४४ चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६८ धावांची अप्रतिम खेळी खेळली. तिने कर्णधार हरमनप्रीत कौर (३६ धावा) सोबत तिसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भक्कम भागीदारी रचून भारताला मजबूत स्थितीत आणले. डावाच्या शेवटच्या षटकांमध्ये यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोषने अवघ्या १७ चेंडूंत ३४ धावांची तुफानी खेळी करत भारताला १७० धावांचा टप्पा पार करून दिला.
https://prahaar.in/2026/06/14/asian-games-2026-indian-badminton-squad-announced-for-the-asian-games-sindhu-to-lead-the-team/
१७१ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजीसमोर अजिबात टिकता आले नाही. दीप्ती शर्माने आपल्या फिरकीच्या जादुई माऱ्याने पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. तिने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत ‘पंच’ (५ बळी) मिळवला. दीप्तीच्या या भेदक माऱ्यामुळे पाकिस्तानचा संपूर्ण संघ १७ व्या षटकात अवघ्या १०६ धावांवर बाद झाला. या मोठ्या विजयामुळे भारतीय महिला संघाने विश्वचषक मोहिमेची अत्यंत दिमाखदार सुरुवात केली असून, हा विजय आगामी सामन्यांसाठी संघाचा आत्मविश्वास वाढवणारा ठरेल.
https://prahaar.in/2026/06/14/parul-chaudhary-broke-the-national-record-in-the-5000m-race-in-france/
पॉवरप्लेच्या अखेरीस पाकिस्तान १ बाद ५२ अशा भक्कम स्थितीत होता. पण दीप्तीने ४ षटकांत अवघ्या १० धावा देत ५ बळी घेतले. पाकिस्तानच्या मधल्या फळीचा कणाच मोडला. तिच्या या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानच्या फलंदाजांना खेळपट्टीवर उभे राहणेही कठीण झाले. पाकिस्तानकडून सलामीवीर मुनीबा अलीने सर्वाधिक ४१ धावा केल्या, मात्र ती झाल्यानंतर संपूर्ण संघ पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. कर्णधार फातिमा साना भोपळाही न फोडता (०) बाद झाली, तर आलिया रियाझ केवळ १८ धावा करू शकली. दरम्यान दीप्ती शर्माला नवोदित गोलंदाज श्री चरणी हिने उत्तम साथ दिली. तिने ४ षटकांत २१ धावांच्या मोबदल्यात ३ फलंदाजांना तंबूत धाडले. शेवटच्या षटकांत दीप्तीने लागोपाठ दोन चेंडूंवर दोन बळी घेत पाकिस्तानचा डाव १७ व्या षटकांत १०६ धावांवर संपुष्टात आणला आणि भारताच्या ६४ धावांच्या दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले.
https://prahaar.in/2026/06/14/archery-world-cup-2026-dheeraj-bommadevara-and-kumkums-golden-feat-won-gold-by-defeating-olympic-champions/
भारत महिला संघ : २० षटकांत ६ बाद १७० धावा (स्मृती मानधना ६८, हरमनप्रीत कौर ३६, रिचा घोष ३४; सादिया इक्बाल २/४१, फातिमा साना २/३३)
पाकिस्तान महिला संघ : १७ षटकांत सर्वबाद १०६ धावा (मुनीबा अली ४१, आलिया रियाझ १८; दीप्ती शर्मा ५/१०, श्री चरणी ३/२१)
निकाल : भारतीय महिला संघ ६४ धावांनी विजयी