Nashik : नाशिक जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची लगबग आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. कारण येत्या १५ जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून गावागावांत आणि शाळाशाळांत जय्यत तयारी सुरू असून, एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रशासन, शिक्षक, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ एकत्रितपणे कामाला लागले आहेत.
पाखरे निघाली शाळेला
शिक्षण मंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांच्या ‘पाखरे निघाली शाळेला’ या संकल्पनेतून आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार (Omkar Pawar) यांच्या नेतृत्वाखाली प्रवेशोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा, तालुका आणि गटस्तरावर कार्यशाळा, पालक सभा, घरभेटी आणि समाजमाध्यमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा शाळा प्रवेशोत्सव खऱ्या अर्थाने ‘आनंदोत्सव’ ठरावा यासाठी शिक्षण विभाग विशेष प्रयत्न करत आहे.
https://prahaar.in/2026/06/13/death-of-husband-and-wife-in-manmad-causes-grief/
यंदाचा प्रवेशोत्सव ठरणार अधिक विशेष
१५ जून रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (District Collector Ayush Prasad) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रथम व द्वितीय श्रेणीचे शासकीय अधिकारी विविध शाळांना भेट देणार आहेत. त्यामुळे यंदाचा प्रवेशोत्सव अधिक विशेष ठरणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील शाळांमध्ये सध्या स्वच्छता मोहीम, रंगरंगोटी, वर्गखोल्यांची सजावट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे काम वेगाने सुरू आहे. नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत संस्मरणीय व्हावे यासाठी शाळा परिसर आकर्षक पद्धतीने सजवला जात आहे.
https://prahaar.in/2026/06/13/major-twist-in-the-malegaon-illegal-delivery-case/
माजी विद्यार्थी, माजी सैनिकांना उपस्थितीचे आवाहन
प्रवेशोत्सवाच्या दिवशी गावोगावी प्रभातफेरी, देशभक्तीपर गीतं, नव्या विद्यार्थ्यांचे पुष्पवर्षावाने स्वागत, मोफत पाठ्यपुस्तकं आणि गणवेश वाटप, मिष्ठान्न भोजन तसेच गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा सत्कार अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत सदस्य, माजी विद्यार्थी, महिला बचत गट, युवक मंडळ, ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक आणि वीरमातांनाही शाळांमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
https://prahaar.in/2026/06/13/i-have-no-regrets-i-am-calm-minister-chhagan-bhujbals-telling-statement/
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
यंदा जिल्हा परिषद प्रशासनाने ६ ते १४ वयोगटातील १०० टक्के बालकांची शाळेत नोंदणी आणि उपस्थितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवेशपात्र बालक शाळेत दाखल व्हावे, यासाठी शिक्षकांकडून विशेष पाठपुरावा सुरू आहे. तर दुसरीकडे आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळाही नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी दप्तर, बूट, पुस्तके, वह्या आणि स्टेशनरीसह विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.एकूणच काय १५ जून रोजी नाशिक जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षणाचा उत्सव रंगणार असून, ‘पाखरे निघाली शाळेला’ या संकल्पनेला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.”