Chhagan Bhujbal News : राज्यसभेची संधी हुकल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीररित्या नाराजीचा सूर आळवला होता. राष्ट्रवादीच्या वर्धापनदिन कार्यक्रमातही त्यांची देहबोली काहीशी वेगळी दिसत होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात असतानाच, “मला कोणतीही खंत नाही, मी सध्या शांत असून पक्षाचे काम करत आहे,” असे सूचक वक्तव्य भुजबळ यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ राज्यसभेवर जाण्यासाठी प्रचंड उत्सुक होते आणि त्यांनी त्यासाठी जोरदार फिल्डिंगही लावली होती. मात्र, त्यांनी राज्यसभेवर जाताना एक मोठी अट पक्षासमोर ठेवली होती. “मी दिल्लीत गेल्यास माझे पुतणे समीर भुजबळ यांना आमदार करावे आणि राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे,” असे भुजबळ यांचे म्हणणे होते. परंतु, भाजपकडून तातडीच्या फेरबदलाबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. वेळेअभावी हा निर्णय प्रलंबित राहिल्याने अखेर छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर जाणे टाळले. यामुळे राष्ट्रवादीने ऐनवेळी राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. या सर्व घडामोडींमुळे भुजबळ पक्षात नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
https://prahaar.in/2026/06/13/fearing-operation-tiger-ubatha-holds-meetings-at-matoshree/
याबाबत आपली भूमिका मांडताना ते म्हणाले, “होय, मला राज्यसभेवर जायचे होते, हे खरे आहे. पण जी आमची लेकरं आहेत, जे कर्तबगार आहेत, त्यांनाही पक्षात आणि सत्तेत संधी मिळाली पाहिजे. मी राज्यसभेवर गेल्यानंतर समीर भुजबळ यांना माझ्या जागेवर संधी द्यावी आणि आगामी मंत्रिमंडळ फेरबदलात त्यांच्या नावाचा विचार करावा, असे माझे प्रामाणिक मत होते. मात्र, वेळ खूप कमी होता, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हे शक्य होऊ शकले नाही. समीर भुजबळ यांनी यापूर्वी कधीही कुठे काही मागितले नाही. पण या निर्णयाने मला कोणतीही खंत वाटलेली नाही. मी पूर्णपणे शांत असून पक्षाच्या कामात स्वतःला वाहून घेतले आहे,” असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
https://prahaar.in/2026/06/13/there-is-no-proposal-for-a-merger-with-the-congress/
अर्थमंत्रीपदाबाबत काय म्हणाले भुजबळ?
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेले राज्याचे अर्थ खाते गेली पाच महिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, “देवेंद्र फडणवीसांइतके हे खाते सांभाळेल असा एकही सक्षम नेता सध्या दिसत नाही,” असे वक्तव्य करत उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. राऊत यांच्या या विधानावर भुजबळ यांनी पलटवार केला. “संजय राऊत सांगतील त्यानुसार जर राज्यात खातेवाटप होणार असेल, तर मग काय बोलावं? या विषयावर सुनेत्रा पवार योग्य ते लक्ष घालतील आणि बोलतील,” असेही त्यांनी सांगितले.