Home ब्रेकिंग न्यूज Chief Minister Devendra Fadnavis : काँग्रेस बुडते जहाज, त्यात कोणीच पाय ठेवणार नाही !

Chief Minister Devendra Fadnavis : काँग्रेस बुडते जहाज, त्यात कोणीच पाय ठेवणार नाही !

0
Chief Minister Devendra Fadnavis : काँग्रेस बुडते जहाज, त्यात कोणीच पाय ठेवणार नाही !
Devendra Fadnavis

 राष्ट्रवादी आणि तृणमूलच्या विलीनीकरणावर केले भाष्य

मुंबई : “काँग्रेस हे सध्या बुडते जहाज आहे आणि विरोधी पक्षांमधील नेते इतके हुशार आहेत की ते या बुडत्या जहाजात कधीच पाय ठेवणार नाहीत,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेचा समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला यशस्वी १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या चर्चांवर खोचक टिप्पणी करत उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनाही लक्ष्य केले. ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ अशी राऊत यांची अवस्था असल्याची चपराक त्यांनी लगावली.

https://prahaar.in/2026/06/12/ahilyanagar-transfer-of-police-officers/

विलीनीकरणाच्या सुरू असलेल्या चर्चांवर मुख्यमंत्री म्हणाले, “अतिशोयक्तीपूर्ण बोलणे राजकारणात योग्य नसते. परंतु, विरोधी पक्षांनी जर काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले, तर त्याचा फायदा भारतीय जनता पक्षालाच होणार आहे. यामुळे आम्हाला अधिकची ‘पॉलिटिकल स्पेस’ उपलब्ध होईल. विरोधी पक्ष जेवढा मागे हटेल, तेवढी अतिरिक्त स्पेस भाजप काबीज करेल. त्यामुळे या घडामोडींवर आमची ‘वेट अँड वॉच’ची भूमिका आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशात ३६० अंशाचा बदल घडवून आणल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या विकासकामांची जंत्रीच पत्रकार परिषदेत मांडली. “गेल्या १२ वर्षांत मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागलेला नाही. या काळात २५ कोटी जनता गरिबीतून बाहेर आली आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी ‘लखपती दीदी’ झाल्या असून, आगामी काळात हा आकडा ६ कोटींवर नेण्याचे उद्दिष्ट आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.

https://prahaar.in/2026/06/12/epfo-new-scheme/

लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या कुटुंबावर आलेल्या संकटावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. वादळी पावसात वीज पडून बैल दगावल्याने गायकवाड यांच्या पत्नीने स्वतःला जू लावून शेतीची कामे सुरू केल्याचा हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल झाला होता. मुख्यमंत्र्यांनी याची तात्काळ दखल घेत प्रशासनाला मदत करण्याचे आदेश दिले होते. मात्र, गोशाळेतून दिलेला बैल दोनच दिवसांत आजारी पडून शेतात बसल्याने शेतकऱ्यावर उपचाराची वेळ आल्याची बाब समोर आली.यावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री म्हणाले, “ती बातमी अत्यंत मन हेलावणारी होती. शेतकऱ्याने ती जमीन बटाईने कसण्यासाठी घेतली होती. त्यांना मदत म्हणून दिलेला बैल योग्य नसल्याची माहिती मिळताच, मी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने निर्देश दिले असून त्या शेतकऱ्याला शेतीकामासाठी पूर्णपणे सक्षम आणि योग्य तो बैल सरकारी खर्चाने घेऊन देण्याचे आदेश दिले आहेत.”

https://prahaar.in/2026/06/12/prasad-vedpathak-instagram-account-suspended/

‘आज तरी अर्थखातं माझ्याकडेच!’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थ खाते गेल्या पाच महिन्यांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. येत्या २२ जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी हे खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे सुपूर्द करण्यात यावे, यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली होती. सुनेत्रा पवार यांनीही याबाबत पक्षाच्या बैठकीत खंत व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी, “आज तरी अर्थखाते माझ्याकडेच आहे,” असे सांगत तूर्तास या विषयावर अधिक बोलणे टाळले.

https://prahaar.in/2026/06/12/jaspal-rana-passes-away-indias-legendary-shooting-coach-jaspal-rana-passes-away-indian-sports-fraternity-in-mourning/

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर दुबार पेरणी टाळण्याचे आवाहन

राज्यातील कृषी संकटावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कोणत्याही निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता सरकारने ४० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. त्याशिवाय सरकारने मक्यापासून इथेनॉल निर्मिती आणि डाळींच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पाऊस कमी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने राज्य सरकारने विशेष टास्क फोर्स तयार केला आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या कृषी सल्ल्यानुसारच (अॅडव्हायजरी) पेरण्या कराव्यात, जेणेकरून त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट येणार नाही. संकट काळात जनावरांसाठी शासन स्तरावरून वैरण उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.