छत्रपती संभाजीनगर : प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका ४१ वर्षीय विवाहित शिक्षिकेचे लैंगिक, मानसिक आणि आर्थिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरातील कटकट गेट परिसरात उघडकीस आला आहे. एवढेच नव्हे तर दुबईत (Dubai) नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरातील कटकट गेट परिसरात राहणाऱ्या हुसेन अबू सोयदान याने संबंधित विवाहित शिक्षिकेशी जवळीक साधली. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने युट्यूबवर (YouTube) मंगलाष्टके लावून लग्नाचा बनाव रचल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपीने महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवत तिचे लैंगिक शोषण केले.
https://prahaar.in/2026/06/06/toxic-liquor-case-state-excise-department-conducts-crackdown-after-toxic-liquor-case-goods-worth-rs-1-47-crore-seized/
महिलेचा विश्वास जिंकल्यानंतर आरोपीने आपले खरे हेतू समोर आणण्यास सुरुवात केली. दुबईत (Dubai) नोकरी (Job) मिळवून देण्याचे आश्वासन देत त्याने महिलेवर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या काळात महिलेवर वारंवार अत्याचार करण्यात आले तसेच तिला मानसिक त्रासही दिला गेला.
याचबरोबर आरोपीने आर्थिक फायद्यासाठीही महिलेची फसवणूक केली. दुबईला घेऊन जाणे आणि पासपोर्ट (Passport) काढून देण्याचे कारण सांगत त्याने वेळोवेळी तब्बल ३ लाख ४१ हजार रुपये रोख घेतले. तसेच विश्वास संपादन करून ६ तोळे सोन्याचे दागिनेही आपल्या ताब्यात घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
https://prahaar.in/2026/06/06/12th-day-of-marriage-and-the-groom-commits-suicide-that-horrifying-truth-lay-hidden-in-the-wifes-diary/
दरम्यान, २५ एप्रिलनंतर आरोपीने महिलेशी संपर्क कमी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर १ जूनपासून त्याचा मोबाईल (Mobile) पूर्णपणे बंद झाला. सर्व संपर्क तुटल्यानंतर आपली फसवणूक झाल्याची जाणीव महिलेला झाली. त्यानंतर तिने तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हुसेन अबू सोयदान सध्या फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असून पुढील तपास करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून विविध स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे.