Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील बोरखेडा (ता. रावेर) येथे घडलेल्या चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत मुख्य आरोपी महेंद्र सीताराम बारेला याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. गुरुवारी (दि. ४) अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जाधव यांनी हा निकाल दिला. भुसावळ येथे सत्र न्यायालय कार्यरत झाल्यानंतर तब्बल १२ वर्षांनी प्रथमच एखाद्या आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्याने या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. (Jalgaon Crime)
आरोपीला दुहेरी फाशीची शिक्षा
न्यायालयाने वैज्ञानिक, तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरत आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (खून) आणि ३७६ (बलात्कार) अंतर्गत दोषी ठरवले. विशेष म्हणजे, न्यायालयाने या प्रकरणाला अत्यंत गंभीर स्वरूपाचे मानत आरोपीला दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.(Borkheda Murder Case)
https://prahaar.in/2026/06/05/bsnl-cable-theft-exposed-due-to-oil-spill/
नेमकं प्रकरण काय ?
बोरखेडा (Borkheda) गावातील मेताब भिलाला पावरा यांचे कुटुंब नातेवाईकांच्या दशक्रिया विधीसाठी मध्य प्रदेशात गेले होते. त्यावेळी घरात सविता (वय १३), राहुल (वय ११), अनिल (वय ८) आणि सुमन (वय ६) ही चार लहान मुले एकटी होती. आरोपी महेंद्र बारेला याने कुटुंबाचा विश्वास संपादन करून त्यांच्या घरात मुक्काम केला होता. मात्र, रात्रीच्या वेळी त्याने १३ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली.
या अमानुष प्रकाराला विरोध करणाऱ्या इतर तीन लहान भावंडांवरही कुऱ्हाडीने वार करत त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाला होता.ही संतापजनक घटना १६ ऑक्टोबर २०२० रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी वैज्ञानिक पुरावे, फॉरेन्सिक अहवाल आणि परिस्थितीजन्य बाबींच्या आधारे आरोपीविरोधात मजबूत पुरावे सादर केले. न्यायालयाने हे सर्व पुरावे ग्राह्य धरत आरोपी दोषी असल्याचे स्पष्ट केले.
https://prahaar.in/2026/06/05/akanksha-chaturvedi-neet-suicide-nagpur-update/
आरोपीला अपील करण्याची संधी उपलब्ध
दरम्यान, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, फाशीच्या शिक्षेनंतर हे प्रकरण नियमानुसार एका महिन्याच्या आत मुंबई उच्च न्यायालयाकडे कन्फर्मेशनसाठी पाठविण्यात येईल. त्यानंतर आरोपीला अपील करण्याची संधी उपलब्ध राहणार आहे. उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतरच फाशीच्या शिक्षेवर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.
या निकालानंतर जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात चर्चांना उधाण आले असून, अशा अमानुष गुन्ह्यांवर कठोर शिक्षा होणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.