मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना अखेर पावसाने दिलासा दिला आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर मुंबईसह पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ‘यलो अलर्ट’नुसार शहरात पावसाची सुरुवात झाली असून सकाळच्या गर्दीच्या वेळी अचानक वाढलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. (Mumbai Pre-Monsoon Rains)
https://prahaar.in/2026/06/02/monsoon-on-the-threshold-of-kerala/
वसई-विरार परिसरातही सकाळपासून विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र दिसून आले, तर कामावर आणि शाळा-महाविद्यालयांकडे निघालेल्या नागरिकांना पावसामुळे गैरसोयीचा सामना करावा लागला. काही ठिकाणी वाहतूक मंदावल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. (Mumbai Pre-Monsoon Rains)
दरम्यान, राज्यातील यंदाच्या पावसाबाबत ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी आश्वासक अंदाज व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात काही भागांत सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमानाची शक्यता असली तरी एकूण मान्सून सुमारे ९८ टक्के राहण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. सध्या एल निनोची परिस्थिती सक्रिय नसल्याने आणि भारतीय महासागरातील हवामान निर्देशांक सकारात्मक दिशेने सरकत असल्याने मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचे त्यांनी सांगितले. (Mumbai Pre-Monsoon Rains)
https://prahaar.in/2026/06/02/cabinet-decision-criteria-for-farmer-loan-waiver-announced/
गेल्या २४ वर्षांपासून स्वतः विकसित केलेल्या ‘साबळे मॉडेल’च्या आधारे डॉ. साबळे दरवर्षी १ जून रोजी मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज जाहीर करतात. यंदाच्या अंदाजात राज्यातील १७ जिल्हे आणि ८४ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग, हवेचा दाब आणि इतर हवामान घटकांचा अभ्यास करून हा अंदाज तयार करण्यात आला असून त्यात सुमारे पाच टक्के त्रुटीची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. (Mumbai Pre-Monsoon Rains)