मुंबई : मुंबई (Mumbai) महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) (MMRDA) यांच्या महत्त्वाकांक्षी सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (SCLR) विस्तार प्रकल्पातील दुसरा टप्पा अर्थात बीकेसी-वाकोला उन्नत मार्ग आता पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे. या मार्गाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून सध्या रंगरंगोटी आणि अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग वाहनचालकांसाठी खुला करण्यात येणार आहे.
एमएमआरडीएने अद्याप उद्घाटनाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नसली तरी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या मार्गामुळे बीकेसी (BKC) आणि पश्चिम उपनगरांदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे.
https://prahaar.in/2026/06/01/revenge-for-garibnagar-encroachment-terrorist-attack-plot-foiled-in-mumbai/
सुमारे १.२ किलोमीटर लांबीचा हा उन्नत मार्ग मूळतः मार्च महिन्यातच सुरू होण्याची अपेक्षा होती. मात्र विविध कारणांमुळे कामास विलंब झाल्याने तो वेळेत खुला होऊ शकला नाही. आता प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचल्याने लवकरच नागरिकांना त्याचा लाभ मिळणार आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीला वाकोला नाल्यावरील पुलावर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी ५४ मीटर लांबीचे दुहेरी कॉम्पोझिट गर्डर्स (Composite Girder) बसविण्यात आले होते. त्यानंतर उर्वरित रस्ते बांधणीच्या कामाला वेग देण्यात आला. सध्या शेवटच्या ५४ मीटर भागावरील काम सुरू असून ते येत्या दोन दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
https://prahaar.in/2026/05/31/ipl-2026-final-virats-strong-innings-rcb-becomes-champion-for-the-second-time-in-a-row-gujarat-defeated-by-5-wickets/
दोन लेनचा आणि पूर्णपणे सिग्नलविरहित असलेला हा मार्ग वाहनचालकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. सध्या सांताक्रूझ ते बीकेसी हा प्रवास करण्यासाठी साधारण ३० ते ३५ मिनिटे लागतात. मात्र नवीन मार्ग सुरू झाल्यानंतर हा प्रवास केवळ ५ ते १० मिनिटांत पूर्ण होऊ शकणार आहे.
या १.२ किलोमीटर लांबीच्या बीकेसी-वाकोला मार्गासाठी एमएमआरडीएने सुमारे ६४५ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. एससीएलआर (SCLR) विस्तार प्रकल्पामुळे वाकोला जंक्शन, आंबेडकर चौक, युनिव्हर्सिटी जंक्शन आणि बीकेसी जंक्शन या महत्त्वाच्या भागांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहे.
याशिवाय, पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या वाहतुकीसाठी हा मार्ग महत्त्वाची भूमिका बजावणार असून शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होईल. पश्चिम द्रुतगती महामार्गावरून दहिसरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना एससीएलआरशी थेट जोडणी मिळणार आहे. तसेच दहिसरकडून येणाऱ्या वाहनांनाही पश्चिम द्रुतगती महामार्गावरील (Western Express Highway) उड्डाणपुलामार्फत या उन्नत मार्गाचा वापर करता येणार आहे. त्यामुळे वाकोला जंक्शन, आंबेडकर चौक, युनिव्हर्सिटी जंक्शन आणि बीकेसी परिसरातील प्रवास अधिक वेगवान होणार आहे.