Home ब्रेकिंग न्यूज Kurla BKC Skywalk : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कुर्ला–बीकेसी स्कायवॉक जूनमध्ये खुला होणार

Kurla BKC Skywalk : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कुर्ला–बीकेसी स्कायवॉक जूनमध्ये खुला होणार

0
Kurla BKC Skywalk : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कुर्ला–बीकेसी स्कायवॉक जूनमध्ये खुला होणार
Kurla Skywalk

मुंबई : मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक असलेल्या कुर्ला–बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) परिसरातील प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. तब्बल पाच वर्षांच्या विलंबानंतर कुर्ला पश्चिमेतील एलबीएस (LBS) रोडवरील बहुप्रतीक्षित स्कायवॉक अखेर पूर्णत्वाच्या मार्गावर असून जूनच्या पहिल्या आठवड्यात तो नागरिकांसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

टॅक्सीमन कॉलनी आणि श्रीकृष्ण चौक यांना जोडणारा हा स्कायवॉक (Skywalk) सीताराम भैरू मार्गावर उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे कुर्ला रेल्वे स्थानक (Kurla Railway Station) आणि बीकेसीदरम्यान (BKC) प्रवास करणाऱ्या हजारो पादचाऱ्यांना सुरक्षित आणि जलद मार्ग उपलब्ध होणार आहे. विशेषतः कार्यालयीन वेळेत होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यास या सुविधेची मोठी मदत होणार आहे.

https://prahaar.in/2026/05/31/overhead-wire-breaks-between-sion-matunga-stations-central-railway-traffic-disrupted/

या स्कायवॉकला २०२१ मध्ये मंजुरी मिळाली होती. सुरुवातीला १८ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र भूमिगत वीजवाहिन्या, महानगर गॅसची पाईपलाईन, पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिन्या, जलवाहिन्या तसेच अतिक्रमण यांसारख्या अडचणींमुळे प्रकल्प वारंवार रखडला. परिणामी काम पूर्ण होण्याची मुदत अनेकदा वाढवावी लागली.

सुमारे १४.३६ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून अंतिम टप्प्यातील कामे सुरू आहेत. स्कायवॉक सुरू झाल्यानंतर पादचाऱ्यांना गजबजलेल्या एलबीएस रोडवरील वाहतुकीतून मार्ग काढण्याची गरज भासणार नाही. तसेच पावसाळ्यात होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येपासूनही मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, स्कायवॉकच्या दोन्ही टोकांवरील एस्कलेटर (Escalator) बसविण्याचे काम अद्याप सुरू असून ते लवकर पूर्ण करून ही सुविधा नागरिकांसाठी तातडीने खुली करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.