हसन मुश्रीफ यांचा समावेश होणार; सुनेत्रा पवार निवडणूक आयोगाला नवी यादी सादर करणार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची सुधारित यादी लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करणार आहेत. या नवीन यादीमध्ये मोठा फेरबदल करण्यात येणार असून नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक, सुबोध मोहिते आणि संजय प्रजापती यांना कार्यकारिणीतून वगळले जाण्याची दाट शक्यता आहे. तर त्यांच्या जागी ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांचा समावेश करून पक्षांतर्गत निर्माण झालेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मंगळवारी रात्री झालेल्या वादळी बैठकीनंतर वरिष्ठ पातळीवर हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
https://prahaar.in/2026/05/27/nashik-main-suspect-in-panchvati-murder-case-arrested/
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात सध्या वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत. मंगळवारी रात्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवल्यामुळे बैठकीत चांगलेच वादळ निर्माण झाले होते. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांचा उल्लेख नसल्याने या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना बाजूला केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. तसेच काही नवख्या चेहऱ्यांना थेट कार्यकारिणीत स्थान दिल्याने ज्येष्ठ नेत्यांमध्ये असंतोष पसरला होता.
https://prahaar.in/2026/05/27/sharad-pawar-admitted-to-breach-candy-hospital/
या पार्श्वभूमीवर पक्षातील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी अखेर राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पावले उचलली आहेत. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नाराजी दूर करण्यासाठी आणि पक्षातील संतुलन राखण्यासाठी कार्यकारिणीची जुनी यादी बदलून सुधारित यादी निवडणूक आयोगाला देण्याची तयारी सुरू झाली आहे. या नव्या रचनेत सना मलिक यांच्याऐवजी अनुभवी नेते हसन मुश्रीफ यांना संधी देऊन पक्षाची घडी पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या फेरबदलानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस थांबणार की नवीन राजकीय पेच निर्माण होणार, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.