Wednesday, May 27, 2026

Ahilyanagar Legislative Council : अहिल्यानगर विधानपरिषदेसाठी प्राजक्त तनपुरे भाजपचे उमेदवार?

Ahilyanagar Legislative Council : अहिल्यानगर विधानपरिषदेसाठी प्राजक्त तनपुरे भाजपचे उमेदवार?

३० मे रोजी कमळ हाती घेणार; पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याचे फळ मिळणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे खंदे शिलेदार आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांचे म्हणणे आहे. येत्या ३० मे रोजी तनपुरे यांचा अधिकृत पक्षप्रवेश होण्याची दाट शक्यता असून, या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १ जून असल्याने पुढील ४८ तासांत अहिल्यानगरच्या राजकारणाला अत्यंत अनपेक्षित वळण मिळण्याची चिन्हे आहेत.

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतल्यापासूनच तनपुरे यांच्या राजकीय (Political) भूमिकेविषयी तर्कवितर्क लढवले जात होते, त्यावर आता या संभाव्य भाजप प्रवेशामुळे शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. या सर्व राजकीय घडामोडींमध्ये सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती प्राजक्त तनपुरे यांच्या सोशल मीडियावरील 'डीपी'ची. भाजप प्रवेशाच्या चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच तनपुरे यांनी आपल्या फेसबुक आणि इतर सोशल मीडिया अकाऊंटचा मुख्य फोटो (डीपी) (DP) बदलून तिथे आपले मामा आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचा फोटो लावला आहे. शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू नेत्याच्या भाच्यानेच 'कमळ' हाती घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, राहुरी पोटनिवडणुकीतून माघार घेताना प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केलेली खंत त्यांच्या पक्षांतराचे मुख्य कारण मानली जात आहे. "माझ्यासोबत पक्षात असणारे तिघेजण अजित पवार गटात गेले आणि त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. मात्र, दुसरीकडे आमच्यासारख्या निष्ठा ठेवणाऱ्या नेत्यांचे राजकारण पद्धतशीरपणे संपवले जात आहे," अशी उद्विग्न भावना त्यांनी बोलून दाखवली होती.

अहिल्यानगरचे (Ahilyanagar) सत्तासमीकरण बदलणार

प्राजक्त तनपुरे यांच्या रूपाने अहिल्यानगर जिल्ह्यात एक मोठा आणि तरुण चेहरा आपल्या गळाला लावण्यात भाजपला यश आल्याचे बोलले जात आहे. १ जून रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने, ३० मे रोजीच्या पक्षप्रवेशानंतर लगेचच तनपुरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा भाजपकडून केली जाऊ शकते. या खेळीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारंपरिक सत्तासमीकरणे मात्र पूर्णपणे बदलणार आहेत.

 
Comments
Add Comment