मुंबई : भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘टाटा मोटर्स’ आणि सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज तेल कंपनी ‘हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि कचरा व्यवस्थापनाला नवी दिशा देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. गाड्यांमध्ये वापरून खराब झालेल्या ऑईलचे संकलन करून त्याचा सुरक्षित पुनर्वापर करण्यासाठी दोन्ही कंपन्यांनी एका ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या उपक्रमांतर्गत भारतात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर ‘चक्रीय अर्थव्यवस्था मॉडेल’ विकसित केले जाणार आहे, ज्यामुळे पर्यावरणाची हानी टळणार आहे.खराब ऑईलचे रूपांतर होणार उच्च दर्जाच्या इंधनात!
सध्या गाड्यांमधून काढलेले जुने आणि काळे झालेले ऑईल अनेकदा उघड्यावर किंवा पाण्यात सोडले जाते, ज्यामुळे पाण्याचे आणि जमिनीचे प्रचंड प्रदूषण होते. मात्र, आता या करारामुळे वापरलेल्या या तेलाचे संकलन, साठवणूक आणि वाहतूक करण्यासाठी एक संपूर्ण संघटित आणि ट्रॅक करण्यायोग्य (डिजिटल) यंत्रणा तयार केली जाईल. हे खराब तेल अत्याधुनिक तंत्रज्ञानाने पुनर्प्रक्रिया करून पुन्हा उच्च दर्जाच्या बेस ऑईलमध्ये रूपांतरित केले जाईल, जे पुन्हा गाड्यांसाठी वापरता येऊ शकेल. कंपंनी प्रमुख्यांच्या म्हणण्यानुसार “वापरलेल्या तेलाचा पुन्हा वापर करणे हे कार्बन फूटप्रिंट (प्रदूषण) कमी करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. टाटा मोटर्ससोबतच्या या भागीदारीमुळे देशात खऱ्या अर्थाने नैसर्गिक संसाधनांची बचत होईल.
https://prahaar.in/2026/05/26/raja-shivaji-movie-superhit-know-the-detailed-earnings-figures/
या संपूर्ण प्रक्रियेत दोन्ही कंपन्यांनी आपल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत. यात टाटा मोटर्स आपल्या देशभरातील अधिकृत सर्व्हिस सेंटर्सच्या माध्यमातून गाड्यांमधून निघणारे जुने ऑईल गोळा करण्यास मदत करेल. तर एचपीसीएल आपल्या अधिकृत संकलन यंत्रणेद्वारे या वापरलेल्या लुब्रिकंट्सचे संकलन करून ते प्रक्रिया केंद्रापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवेल. सुरुवातीला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर देशातील काही निवडक राज्यांमध्ये राबवला जाणार आहे. या प्रकल्पावर देखरेख ठेवण्यासाठी दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींची एक संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर हे मॉडेल संपूर्ण देशभरात लागू केले जाईल, ज्यामुळे भारताच्या ‘हरित क्रांती’ला मोठे बळ मिळणार आहे.