Home ब्रेकिंग न्यूज सुबोध मोहिते, प्रमोद हिंदुराव की अविनाश आदिक?

सुबोध मोहिते, प्रमोद हिंदुराव की अविनाश आदिक?

0
सुबोध मोहिते, प्रमोद हिंदुराव की अविनाश आदिक?

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीत तीन नावांवर खल; सुनेत्रा पवार करणार अंतिम शिक्कामोर्तब

मुंबई : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या घोषणेनंतर महायुतीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात उमेदवारीसाठी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. या रिक्त जागेवर संसदेत कोणाला पाठवायचे, यावर पक्षात अंतर्गत खलबते सुरू असून सध्या प्रामुख्याने माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रमोद हिंदुराव यांच्या नावांवर पक्षाच्या कोअर कमिटीत जोरदार खल सुरू आहे. या संभाव्य नावांपैकी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार या आगामी दोन ते तीन दिवसांत अंतिम नावावर शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणूक जिंकल्यानंतर ६ मे २०२६ रोजी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांचा हा मूळ कार्यकाळ ४ जुलै २०२८ पर्यंत होता. या जागेवरून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाण्यासाठी कमालीचे उत्सुक होते आणि राजकीय वर्तुळात त्यांच्याच नावाची सर्वाधिक चर्चा होती. तसेच सुनेत्रा पवार यांचे दुसरे सुपुत्र जय पवार यांचेही नाव चर्चेत आणले गेले होते.

मात्र, विश्वासू सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ यांना तूर्तास दिल्लीत पाठवण्यास पक्षनेतृत्व फारसे उत्सुक नाही. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता भुजबळांसारखा बडा ओबीसी चेहरा राज्यातच असणे पक्षासाठी फायदेशीर ठरेल, असा एक सूर पक्षात आहे. त्यामुळेच भुजबळ आणि जय पवार यांच्या नावांना मागे टाकत आता सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक आणि प्रमोद हिंदुराव या तीन नावांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

१८ जूनला मतदान

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, या राज्यसभा जागेसाठी येत्या १८ जून २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी करून निकाल घोषित केला जाईल. विशेष म्हणजे, याच दिवशी विधानपरिषदेच्या १६ रिक्त जागांसाठी आणि नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था पोटनिवडणुकीसाठीही मतदान होणार आहे. त्यामुळे १८ जून हा दिवस राज्याच्या राजकीय भविष्यासाठी ‘सुपर थर्सडे’ ठरणार आहे.

निवडणूक कार्यक्रम असा
निवडणूक अधिसूचना जारी होणार : १ जून २०२६
नामांकन अंतिम तारीख : ८ जून २०२६
उमेदवारी अर्जांची छाननी : ९ जून २०२६
अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत : ११ जून २०२६
मतदानाचा दिनांक आणि वेळ : १८ जून २०२६ (सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत)
मतमोजणी : १८ जून २०२६ (सायंकाळी ५:०० वाजता)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here