Home ब्रेकिंग न्यूज Blinkit News : ऑनलाईन फूड डिलिव्हरीचा धक्कादायक प्रकार; एक्स्पायर मटकी पोहोचल्याने संताप

Blinkit News : ऑनलाईन फूड डिलिव्हरीचा धक्कादायक प्रकार; एक्स्पायर मटकी पोहोचल्याने संताप

0
Blinkit News : ऑनलाईन फूड डिलिव्हरीचा धक्कादायक प्रकार; एक्स्पायर मटकी पोहोचल्याने संताप
BlinkIt fraud

अकोला : ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या वाढत्या वापरामुळे ग्राहकांना घरबसल्या सुविधा मिळत असल्या, तरी याच सेवांच्या माध्यमातून ग्राहकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव अकोल्यात समोर आले आहे. राज्यभरात सध्या कलिंगडातून विषबाधेच्या घटनांची चर्चा सुरू असतानाच, एका नामांकित ऑनलाईन डिलिव्हरी कंपनीकडून ग्राहकाला थेट एक्स्पायर झालेला खाद्यपदार्थ पाठवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

https://prahaar.in/2026/05/17/torture-over-love-affair-in-bhayander-youth-kidnapped-and-brutally-beaten/

नेमकं काय घडलं? वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट यांनी ब्लिंकिट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून २०० ग्रॅम मटकी स्प्राऊट्सचे पाकीट ऑर्डर केले होते. डिलिव्हरी मिळाल्यानंतर त्यांनी पार्सल उघडताच त्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. संशय आल्याने त्यांनी तत्काळ पाकिटावरील माहिती तपासली. त्यावेळी त्या मटकीच्या पाकिटावर नमूद केलेली एक्सपायरी डेट पाहून त्यांना धक्काच बसला.

सदर मटकी स्प्राऊट्सची एक्सपायरी डेट १२ एप्रिल २०२६ अशी होती. म्हणजेच मुदत संपून गेलेला खाद्यपदार्थ ग्राहकाला थेट विकण्यात आल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे हा प्रकार अत्यंत निष्काळजीपणाचा असून, अशा अन्नपदार्थांमुळे ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

कंपनीकडून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न? हा प्रकार समोर आल्यानंतर अरुंधती शिरसाट यांनी तातडीने संबंधित ऑनलाईन डिलिव्हरी कंपनीशी संपर्क साधला. मात्र, एवढ्या गंभीर प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी किंवा दोषींवर कारवाईचे आश्वासन देण्याऐवजी कंपनीकडून केवळ रिफंड देण्याची भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ग्राहकांच्या जीवाशी संबंधित इतक्या गंभीर प्रकरणात फक्त पैसे परत करून जबाबदारी संपते का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. सोशल मीडियावरही या प्रकारावर संताप व्यक्त केला जात असून, ऑनलाईन कंपन्यांच्या बेफिकीरीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अन्न व औषध प्रशासन मौनात?

या प्रकरणी अकोल्याचे अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त देवानंद वीर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अशा गंभीर प्रकरणांकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

https://prahaar.in/2026/05/17/gold-and-silver-import-in-india/

शहरात मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे खाद्यपदार्थांची विक्री केली जात असताना, त्यांच्या गुणवत्ता तपासणीवर नेमके कोणाचे नियंत्रण आहे, असा सवालही आता नागरिकांकडून विचारला जात आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत खराब, कुजलेले किंवा बुरशी लागलेले अन्नपदार्थ खाल्ल्यास विषबाधा किंवा इतर गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अरुंधती शिरसाट यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे. तसेच ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवताना ग्राहकांनीही अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here