Home ब्रेकिंग न्यूज US China : तैवानकडे वाकड्या नजरेने पाहू नका, जिनपिंग यांचा ट्रम्प यांना इशारा

US China : तैवानकडे वाकड्या नजरेने पाहू नका, जिनपिंग यांचा ट्रम्प यांना इशारा

0
US China : तैवानकडे वाकड्या नजरेने पाहू नका, जिनपिंग यांचा ट्रम्प यांना इशारा

बीजिंग : जगातील दोन महासत्तांचे नेते, डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात बीजिंगमधील ‘ग्रेट हॉल ऑफ द पीपल’ येथे अत्यंत महत्त्वाची द्विपक्षीय शिखर परिषद पार पडली. २०१७ नंतर या दोन नेत्यांची चीनमधील ही पहिलीच समोरासमोर भेट असून, जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. शी जिनपिंग यांनी तैवानच्या मुद्द्यावरून अमेरिकेला स्पष्ट इशारा दिला. “तैवान हा चीन-अमेरिका संबंधांमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे,” असे नमूद करत त्यांनी सावध केले की, या विषयावर चुकीचे पाऊल पडल्यास दोन्ही देशांमध्ये संघर्ष किंवा चकमक उडू शकते, ज्यामुळे संपूर्ण द्विपक्षीय संबंध धोक्यात येतील. ‘थुसिडाइड्स ट्रॅप’ टाळून दोन्ही देशांनी सहकार्याचा नवा मार्ग शोधण्याचे आवाहन त्यांनी केले.

होर्मुझची सामुद्रधुनी आणि इराणच्या अण्वस्त्र मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले. होर्मुझची सामुद्रधुनी कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि टोलमुक्त व्यापारासाठी खुली राहिली पाहिजे, यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. इराणकडे कधीही अण्वस्त्रे असू नयेत, यावर अमेरिका आणि चीनचे एकमत झाले. चीनने अमेरिकेकडून अधिक तेल खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली, जेणेकरून भविष्यात होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील त्यांचे अवलंबित्व कमी होईल. ट्रम्प यांच्यासोबत एलॉन मस्क आणि टिम कूक यांसारखे अमेरिकेतील १५ हून अधिक बड्या कंपन्यांचे सीईओ उपस्थित होते. अमेरिकन व्यवसायांना चीनच्या बाजारपेठेत प्रवेश देणे आणि अमेरिकन उद्योगांमध्ये चिनी गुंतवणूक वाढवणे यावर चर्चा झाली. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालणे आणि चीनकडून अमेरिकन कृषी उत्पादनांची खरेदी वाढवणे यावरही भर देण्यात आला.

मैत्रीपूर्ण वातावरण आणि निमंत्रण : ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांना “माझा मित्र” आणि “एक महान नेता” असे संबोधित करत ही चर्चा अत्यंत सकारात्मक आणि फलदायी असल्याचे सांगितले. यावेळेस ट्रम्प यांनी शी जिनपिंग आणि त्यांच्या पत्नीला २४ सप्टेंबर २०२६ रोजी व्हाईट हाऊस भेटीचे अधिकृत निमंत्रण दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here