Home साप्ताहिक अर्थविश्व Air India : एअर इंडियाकडून आंतरराष्ट्रीय विमान सेवेत कपात

Air India : एअर इंडियाकडून आंतरराष्ट्रीय विमान सेवेत कपात

0
Air India : एअर इंडियाकडून आंतरराष्ट्रीय विमान सेवेत कपात

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे विमानांना लागणाऱ्या इंधनाचा (जेट फ्युएल) तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम आता विमान सेवा पुरवणाऱ्या भारतीय कंपन्यांवर होत आहे. एअर इंडियाने जून ते ऑगस्ट दरम्यान विदेशात जाण्यासाठी पुरवल्या जाणाऱ्या विमानसेवेत (आंतरराष्ट्रीय विमानसेवा) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काही मार्गांवरील विमानांची उड्डाणे कमी केली जाणार आहेत. तर काही मार्गांवरील विमानसेवा स्थगित करण्याचा निर्णय एअर इंडियाकडून घेण्यात आला आहे.

टाटा समूहाच्या एअरलाइन कंपनीने सांगितले की, काही देशांवरून उड्डाणांवर असलेल्या निर्बंधांमुळे आणि जेट इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे या मार्गांवर विमान उडवणे तोट्याचे ठरत आहे. पश्चिम आशियात युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात विमान सेवेत कपात करण्यात आली आहे. दिल्ली – शिकागो, दिल्ली – नेवार्क, मुंबई – न्यूयॉर्क, दिल्ली – शांघाई, चेन्नई – सिंगापूर, दिल्ली – मेल आणि मुंबई – ढाका या आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांमध्ये कपात करण्यात आली आहे. तसेच इतर मार्गांवरील विमानसेवा देखील कमी करण्यात आली आहे.

इराण-अमेरिका युद्धामुळे अनेक देशांनी आपली हवाई हद्द प्रतिबंधित केली आहे, ज्यामुळे विमानांना लांबचा फेरा मारून जावे लागत आहे. यामुळे इंधनाचा वापर वाढला आहे. त्याचबरोबर, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे विमान इंधनाचे (ATF) दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. तोट्यात असलेल्या एअर इंडियासाठी हे महागडे मार्ग सुरू ठेवणे कठीण होत होते. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती २८ फेब्रुवारीपासून आतापर्यंत ४५.५% नी वाढल्या आहेत. तरीही, सरकारने देशांतर्गत विमानांसाठी एटीएफच्या किमतीतील वाढ २५% पर्यंत मर्यादित केली होती. त्यामुळे एप्रिलमध्ये तेल देशांतर्गत एटीएफ चे दर फक्त ९.२% नी वाढवले, परंतु आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी ही वाढ खूप जास्त होती.

पश्चिम आशियात युद्ध सुरू होण्यापूर्वी भारतीय विमान कंपन्यांच्या एकूण खर्चात इंधनाचा वाटा सुमारे ४० टक्के होता. आता विमान इंधनाच्या किंमती जागतिक स्तरावर वाढल्या आहेत. त्यामुळे विमान कंपन्यांचा इंधनावरील खर्च वाढला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या इंधनाच्या दराचा एक छोटासा भाग देशाअंतर्गत विमान तिकिटांवर टाकण्यात आला आहे. तर, आंतरराष्ट्रीय विमानांच्या तिकिटावर इंधन दर वाढीचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाला आहे. तिकिटाची मूळ किंमत जवळपास दुप्पट झाल्याचे सांगितले जात आहे. एअर इंडियाने विमानांची उड्डाणे कमी करण्यामागे हे कारणदेखील महत्वाचे आहे.

एअर इंडियाने सांगितले की, मोठ्या कपातीनंतरही, ती दरमहा १२०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवत राहील. यामध्ये हे मार्ग समाविष्ट आहेत:

उत्तर अमेरिका: दर आठवड्याला ३३ उड्डाणे.

युरोप आणि यूके: दर आठवड्याला एकूण १०४ उड्डाणे.

आग्नेय आशिया आणि सार्क देश: दर आठवड्याला १५८ उड्डाणे.

ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका : अनुक्रमे ८ आणि ७ उड्डाणे दर आठवड्याला.

माहितीनुसार, एअर इंडियाने ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात २२० अब्ज रुपयांचे विक्रमी नुकसान नोंदवले आहे. सीईओ कॅम्पबेल विल्सन यांच्या राजीनाम्यानंतर कंपनी नवीन नेतृत्वाच्या शोधात आहे. ही कपात त्याच कॉस्ट-कटिंग (खर्च कपात) योजनेचा भाग आहे, ज्या अंतर्गत अलीकडेच मोठ्या अधिकाऱ्यांच्या पगारात कपात आणि नॉन-टेक्निकल कर्मचाऱ्यांना सुट्टीवर पाठवण्यावर चर्चा झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here