अहिल्यानगर : वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट (NEET) परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात आता आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, गेल्या २४ तासांपासून तपास यंत्रणांना चकवा देणाऱ्या संशयिताला अखेर CBI ने ताब्यात घेतले आहे. धनंजय लोखंडे असे या संशयिताचे नाव असून, त्याला आज सकाळी अहिल्यानगर येथून अटक करण्यात आली.
https://prahaar.in/2026/05/13/cancel-foreign-tours-reduce-the-number-of-cars-in-the-ministers-convoy-devendra-fadnavis/
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील आरोपी खैरनार याचा तो जवळचा साथीदार असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या प्रकरणात त्याची महत्त्वाची भूमिका असू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. धनंजय लोखंडे पुण्यात लपल्याची माहिती समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी शहरात मोठी शोधमोहीम सुरू केली होती. मात्र, तो सतत ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना सापडत नव्हता.
दरम्यान, संशयिताने मंगळवार दुपारपासून आपला मोबाईल बंद ठेवला होता. त्यामुळे त्याचे नेमके लोकेशन शोधण्यात अडचणी निर्माण होत होत्या. तरीही CBI आणि पोलिसांनी तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशनचे जुने रेकॉर्ड आणि इतर डिजिटल पुराव्यांच्या आधारे त्याचा मागोवा घेतला. अखेर तो अहिल्यानगरमध्ये असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर CBI च्या पथकाने तेथे धाड टाकून त्याला ताब्यात घेतले.
https://prahaar.in/2026/05/13/cancel-foreign-tours-reduce-the-number-of-cars-in-the-ministers-convoy-devendra-fadnavis/
या कारवाईनंतर आता NEET पेपरफुटी रॅकेटमधील आणखी महत्त्वाच्या गोष्टी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ताब्यात घेतलेल्या संशयिताची CBI कडून सखोल चौकशी केली जाणार असून, पेपरफुटी कशी झाली, त्यामागे कोणकोण सहभागी होते, तसेच विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्नपत्रिका कशा पोहोचवल्या गेल्या याबाबत तपास अधिक वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे.