मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) (RBI) मुंबईतील ‘सर्वोदय सहकारी बँके’चा परवाना अखेर रद्द केला आहे. बँकेकडे असलेले अपुरे भांडवल, उत्पन्नाची घटलेली साधने आणि बँकिंग नियामक कायद्यातील तरतुदींचे पालन करण्यात आलेले अपयश यावर ठपका ठेवत आरबीआयने ही कारवाई केली आहे. या निर्णयामुळे बँकेचे सर्व बँकिंग व्यवहार बुधवारपासून तातडीने बंद झाले आहेत.
https://prahaar.in/2026/05/13/amol-mitkari-met-sunetra-pawar-on-the-last-day-of-his-mlaship/
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, सर्वोदय सहकारी बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत खालावलेली असून भविष्यात उत्पन्नाची कोणतीही शाश्वती उरलेली नाही. बँक आपल्या ठेवीदारांची देणी पूर्णपणे भागवण्यास असमर्थ असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. “अशा स्थितीत बँकेचे कामकाज पुढे चालू ठेवणे हे ठेवीदारांच्या हितासाठी आणि सार्वजनिक सुरक्षिततेसाठी अत्यंत हानिकारक ठरेल,” असा निष्कर्ष नोंदवत आरबीआयने परवाना रद्द केला आहे.
बँकिंग व्यवहारांवर तात्काळ बंदी
- परवाना रद्द झाल्यामुळे बँकेला आता नवीन ठेवी स्वीकारणे किंवा जुन्या ठेवींची परतफेड करणे यासह कोणत्याही प्रकारचे बँकिंग व्यवहार करता येणार नाहीत. बँकिंग नियमन कायद्यातील महत्त्वाच्या कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
- बँकेचे कामकाज बंद झाल्यानंतर आता नियमानुसार लिक्विडेशनची (परिसमापन) प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यामुळे सर्वोदय सहकारी बँकेच्या हजारो ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, विम्याअंतर्गत आपल्या ठेवी कशा परत मिळतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.