अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेला तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. युद्धविरामासंदर्भात इराणने अमेरिकेच्या नव्या प्रस्तावाला पाकिस्तानमार्फत उत्तर पाठवले आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा प्रस्ताव तत्काळ फेटाळून लावत तो “पूर्णपणे अस्वीकार्य” असल्याचे म्हटले. तथापि, प्रस्तावातील कोणत्या बाबींवर अमेरिकेची आक्षेपार्ह भूमिका आहे, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
इराणने म्हटले आहे की, त्यांना केवळ तात्पुरता नव्हे तर कायमस्वरूपी युद्धविराम हवा आहे. संघर्ष फक्त इराणपुरता मर्यादित न राहता लेबनॉनसह संपूर्ण प्रदेशात शांतता प्रस्थापित व्हावी, अशी तेहरानची मागणी आहे. तसेच समुद्री व्यापार आणि तेलपुरवठ्याच्या मार्गांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचीही इराणची भूमिका आहे.
https://prahaar.in/2026/05/11/pm-modi-greets-countrymen-on-national-technology-day/
अमेरिकेच्या प्रस्तावात युद्ध समाप्त करणे, रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुज सामुद्रधुनीला पुन्हा सुरू करणे आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर मर्यादा आणण्याच्या अटींचा समावेश होता. होर्मुज सामुद्रधुनीला जगातील तेल आणि गॅस पुरवठ्यासाठी सर्वात महत्त्वाचा समुद्री मार्ग मानले जाते.
https://prahaar.in/2026/05/11/ipl-2026-another-rule-violation-controversy-details-of-mobile-phone-use-in-lucknow-dugout-will-bcc-investigate/
याचदरम्यान, खाडी प्रदेशातील ड्रोन हल्ल्यांमुळे तणाव आणखी वाढला आहे. कतारजवळ एका जहाजाला ड्रोन हल्ल्यामुळे आग लागली, तर संयुक्त अरब अमिराती आणि कुवेत यांनी आपल्या हवाई क्षेत्रात संशयास्पद ड्रोन दिसल्याचे सांगितले. यूएईने दावा केला की त्यांनी दोन ड्रोन पाडले असून त्यासाठी इराणला जबाबदार धरले आहे. मात्र या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कतारने जहाजावरील हल्ला अत्यंत धोकादायक असल्याचे म्हटले असून त्यामुळे समुद्री व्यापार आणि आवश्यक पुरवठ्यावर धोका निर्माण झाल्याचे सांगितले आहे.
https://prahaar.in/2026/05/11/india-pakistan-border-high-alert-high-alert-raised-in-sriganganagar-strict-restrictions-in-place-in-border-areas-till-september-15-2026/
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले की, इराणमधून समृद्ध युरेनियम बाहेर काढले जात नाही तोपर्यंत युद्ध पूर्णपणे संपल्याचे मानता येणार नाही. त्यांनी दावा केला की, ट्रम्पही या दिशेने कारवाई करण्याच्या बाजूने आहेत. दरम्यान, व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले की, रशिया अजूनही इराणचे समृद्ध युरेनियम आपल्या ताब्यात ठेवण्याच्या प्रस्तावावर ठाम आहे, जेणेकरून तोडग्याचा मार्ग निघू शकेल. युद्ध संपल्यानंतर होर्मुज सामुद्रधुनीत आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षा मोहीम राबवण्याच्या फ्रान्स आणि ब्रिटन यांच्या योजनेवरून आणखी एक मोठा वाद निर्माण झाला आहे.
इराणने इशारा दिला आहे की, कोणत्याही परदेशी देशाच्या जहाजांनी अमेरिकेच्या कारवाईत सहकार्य केल्यास त्याला तात्काळ आणि कठोर प्रत्युत्तर दिले जाईल. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी स्पष्ट केले की, ही कोणतीही लष्करी तैनाती नसून समुद्री व्यापार सुरक्षित ठेवण्यासाठीची आंतरराष्ट्रीय मोहीम असेल.गेल्या आठवडाभरात फारसची खाडी परिसरातील अनेक जहाजांवर हल्ले झाले आहेत. दक्षिण कोरियानेही खुलासा केला की, त्यांचे एक मालवाहू जहाज होर्मुज सामुद्रधुनीत स्फोट आणि आगीच्या विळख्यात सापडले होते. मात्र या हल्ल्यांमागे नेमके कोण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.