छत्रपती संभाजीनगर : नाशिकमधील टिसीएस (TCS) कंपनीतील कथित लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतरण प्रकरणात मोठी घडामोड समोर य़ेत आहे. या प्रकरणातील फरार आरोपी निदा खान (Nida Khan) हिला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील नरेगाव परिसरातील कैसर कॉलनीतील एका फ्लॅटमधून तिला ताब्यात घेण्यात आले. नाशिक गुन्हे शाखा आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. एसआयटीकडून (SIT) नऊ वेगवेगळ्या गुन्ह्यांची चौकशी सुरू असताना झालेल्या या अटकेमुळे प्रकरणातील धर्मांतरण नेटवर्क, आर्थिक स्रोत आणि इतर धागेदोरे उलगडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
https://prahaar.in/2026/05/08/johny-johny-yes-papa-controversy/
नाशिक टिसीएस (TCS) कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे कथित लैंगिक शोषण, मानसिक छळ, धार्मिक भावना दुखावणे, विनयभंग आणि सक्तीच्या धर्मांतराशी संबंधित दाखल झालेल्या नऊ प्रकरणांचा तपास सध्या विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. याच तपासादरम्यान पोलिसांना मोठे यश मिळाले असून, २५ मार्चपासून फरार असलेल्या निदा खानचा अखेर शोध लागला.
https://prahaar.in/2026/05/08/hat-trick-of-rejection-of-resolution-notices-in-the-municipal-corporation/
आज निदा खानला नाशिक न्यायालयात हजर करण्यात येण्याची शक्यता आहे. यापूर्वी तिने अटकपूर्व जामिनासाठी अनेकदा न्यायालयात धाव घेतली होती. मात्र स्थानिक न्यायालयाने तिचा अर्ज वारंवार फेटाळून लावला. विशेष तपास पथकाने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात गंभीर आरोपांचा उल्लेख करत तिच्या जामिनाला तीव्र विरोध केला होता. २० एप्रिल रोजी न्यायालयाने तिला अंतरिम संरक्षण देण्यासही नकार दिला होता.
या प्रकरणात निदा खानच्या आधीच अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. रझा रफीक मेमन, तौसीफ बिलाल अत्तार, दानिश शेख आणि शाहरुख हुसेन शौकत कुरेशी या चार मुख्य आरोपींना न्यायालयाने १८ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
दरम्यान, या प्रकरणातील एफआयआरमध्ये काही धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. फिर्यादींच्या आरोपानुसार, निदा खान महिला सहकाऱ्यांवर इस्लामिक परंपरा स्वीकारण्यासाठी दबाव टाकत होती. यामध्ये कपडे, आहाराच्या सवयी आणि धार्मिक आचार याबाबत सक्ती केली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष सरकारी वकील अजय मिसार यांनी सादर केलेल्या माहितीनुसार, निदा खानने तक्रारदारांपैकी एका महिलेला बुरखा आणि हिजाब दिला होता. तसेच तिला नमाज शिकवण्यात आला आणि तिच्या मोबाईलमध्ये इस्लामिक शिक्षणाशी संबंधित अॅप्लिकेशन इन्स्टॉल (Application Install) करण्यात आल्याचाही आरोप आहे.
https://prahaar.in/2026/05/08/medical-stores-across-maharashtra-to-remain-closed-on-may-20-know-the-reason-nationwide-chemist-strike/
तपास यंत्रणांच्या मते, पीडितेचे नाव बदलून ‘हानिया’ ठेवण्याचा आणि तिला नोकरीच्या निमित्ताने मलेशियाला पाठवण्याचा कटही रचण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणाचे स्वरूप अधिक गंभीर मानले जात आहे.
आता पोलिसांचे लक्ष निदा खानच्या मोबाईल फोन आणि डायरीवर केंद्रित झाले आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, या दोन्ही गोष्टींमधून बाहेरून मिळणाऱ्या निधीचे स्रोत, मालेगाव आणि मलेशियाशी संबंधित कथित धर्मांतरण नेटवर्कचे संबंध, तसेच या संपूर्ण रॅकेटमागील इतर लोकांची माहिती समोर येऊ शकते. त्यामुळे पोलिस तिच्या कोठडीतील चौकशीसाठी न्यायालयाकडे मागणी करण्याची शक्यता आहे.