– शीव आणि केईएम रुग्णालयातील विविध वैद्यकीय सुविधांचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
अत्याधुनिक आणि गुणवत्तापूर्ण सेवा मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयाच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्याचा अभिमान आहे. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मॅमोग्राफी संयंत्र लोकार्पणाचा मान मला मिळाला, याचा आनंद आहे. स्तनाचा कर्करोग महिलांच्या आरोग्यासमोरील गंभीर आव्हान आहे. परंतु वेळेत तपासणी, वेळीच निदान आणि योग्य उपचाराच्या माध्यमातून या आजारावर नियंत्रण मिळवता येते. रुग्णालयात मॅमोग्राफी उपकरण उपलब्ध झाल्याने महिलांना तपासणीसाठी इतरत्र धावपळ करावी लागणार नाही. या उपकरणामुळे महिलांमध्ये नियमित तपासणीची सवय वाढेल. निदानातील विलंब कमी होईल आणि कुटुंबाच्या आरोग्य सुरक्षेला बळ मिळेल, असे महापौर रितू तावडे यांनी नमूद केले.
https://prahaar.in/2026/05/08/bmc-news-water-supply-in-south-mumbai-restored-from-saturday/
नवजात शिशू अतिदक्षता विभागाचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने स्वच्छ, सुरक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम अतिदक्षता विभागाची सेवा आता उपलब्ध करुन देण्यात आली. अकाली जन्मलेली, कमी वजनाची किंवा जन्मानंतर तातडीच्या वैद्यकीय देखरेखीची गरज असलेल्या नवजात बालकांना या विभागातून उपचार मिळणे शक्य होणार आहे. या सुविधेमुळे नवजात शिशूंची देखरेख अधिक परिणामकारक होईल आणि संसर्ग नियंत्रण शक्य होईल, असेही महापौर रितू तावडे यांनी नमूद केले.
https://prahaar.in/2026/05/08/indias-missile-test-creates-excitement-all-over-the-world-discussion-of-agni-6-missile-test-from-odisha-coast/
मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा मिळतानाच या सुविधांचा फायदा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही होणार आहे. मुंबईकरांचे आरोग्य सुधारण्याच्या अनुषंगाने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी दिली.