Friday, May 8, 2026

Mega Block on Central Railway : रविवारी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक; मेन लाईन आणि ट्रान्स-हार्बरवरील अनेक लोकल सेवा प्रभावित

Mega Block on Central Railway : रविवारी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक; मेन लाईन आणि ट्रान्स-हार्बरवरील अनेक लोकल सेवा प्रभावित

मुंबई : सेंट्रल रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवार, १० मे २०२६ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी मेन लाईनवर माटुंगा ते मुलुंड आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार असून काही सेवा रद्दही करण्यात आल्या आहेत.

मेन लाईनवर जलद मार्गावरील ब्लॉक :

माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गांवर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत ब्लॉक राहणार आहे. या कालावधीत सीएसएमटी Chhatrapati Shivaji Maharaj Terminus येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० दरम्यान सुटणाऱ्या डाउन जलद लोकल सेवा माटुंग स्थानकावरून डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान सर्व नियोजित स्थानकांवर थांबतील. परिणामी प्रवाशांना सुमारे १५ मिनिटांचा अतिरिक्त विलंब सहन करावा लागू शकतो. ठाण्यापुढे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावरून पुन्हा जलद मार्गावर नेण्यात येतील.

त्याचप्रमाणे, ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ दरम्यान सुटणाऱ्या अप जलद गाड्या मुलुंड येथे धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या मुलुंड ते माटुंगा दरम्यान सर्व स्थानकांवर थांबून पुढे माटुंगा येथे पुन्हा जलद मार्गावर जातील. या सेवांनाही सुमारे १५ मिनिटांचा विलंब होणार आहे.

ट्रान्स-हार्बर मार्गावर अनेक सेवा रद्द :

ट्रान्स-हार्बर लाईनवर ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीत ठाणे–वाशी/नेरुळ दरम्यानच्या अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर सेवा पूर्णपणे रद्द राहतील. त्यामुळे या मार्गावरील नियमित प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.

ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ दरम्यान वाशी, नेरुळ आणि पनवेलकडे जाणाऱ्या डाउन सेवा रद्द राहतील. तसेच पनवेल, नेरुळ आणि वाशी येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी ४.०९ दरम्यान ठाण्याकडे येणाऱ्या अप सेवा देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी प्रवासाची व्यवस्था करण्याचे आवाहन केले असून, प्रवासापूर्वी सुधारित वेळापत्रक तपासण्याचा सल्ला दिला आहे. “पायाभूत सुविधांची देखभाल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हे ब्लॉक अत्यावश्यक आहेत,” असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. तसेच होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा