Home क्राईम Bengaluru: अंधश्रद्धेच्या पायात घेतला आईचा बळी, ज्योतिषाच्या दाव्यानंतर रचला हत्येचा कट

Bengaluru: अंधश्रद्धेच्या पायात घेतला आईचा बळी, ज्योतिषाच्या दाव्यानंतर रचला हत्येचा कट

0
Bengaluru: अंधश्रद्धेच्या पायात घेतला आईचा बळी, ज्योतिषाच्या दाव्यानंतर रचला हत्येचा कट

मुंबई: कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात अंधश्रद्धमधून एक भयावह घटना घडली आहे. आपल्या वडिलांच्या निधनाला आईचं जबाबदार आहे आणि तिने करणी ( ‘ब्लॅक मॅजिक’) केली होती. या संशयावरून मुलीने आईची निर्घृण हत्या केली आहे. पुष्पावती असे मृत महिलेचे नाव असून, तिच्या ३३ वर्षीय सुचित्रा नावाच्या मुलीला पोलिसांनी अटक केली आहे.

ज्योतिषाच्या दाव्यानंतर रचला हत्येचा कट

सुचित्रा ही तुमकूर शहरात आपल्या पतीसोबत राहत होती. सुमारे १८ महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांच्या निधनाचे दुःख पचवू न शकलेल्या सुचित्राने एका ज्योतिषाचा सल्ला घेतला. ज्योतिषाने सुचित्राला सांगितले की, तिच्या वडिलांचा मृत्यू नैसर्गिक नसून तिच्या आईने केलेल्या करणीमुळे झाला आहे. या शब्दांवर आंधळा विश्वास ठेवून सुचित्राने आईच्या घरी जाऊन, ती गाढ झोपेत असताना उशीने तिचे तोंड दाबून तिची हत्या केली.

पोलीस घटनास्थळी पोहोचताच…

आईची हत्या केल्यानंतर सुचित्राने हे प्रकरण नैसर्गिक मृत्यूचे असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. पुरावे नष्ट करण्यासाठी तिने घाईघाईने अंत्यसंस्काराची तयारीही सुरू केली. परंतु पुष्पावती यांचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार थांबवले. गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सुचित्राची चौकशी केली असता, तिने आपला गुन्हा कबूल केला.

याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून सुचित्राच्या पतीलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या हत्येच्या कटात पतीचा सहभाग होता का, किंवा त्याला याबद्दल माहिती होती का, याचा तपास पोलीस करत आहेत. ज्या ज्योतिषाने सुचित्राला प्रवृत्त केले, त्याचाही शोध पोलीस घेत असल्याची माहिती समोर आली आहे.