Saturday, May 4, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलPoems and riddles : नदीचे गाणे कविता आणि काव्यकोडी

Poems and riddles : नदीचे गाणे कविता आणि काव्यकोडी

  • एकनाथ आव्हाड

नदीचे गाणे 

स्वच्छ मधुर पाणी घेऊन
आले तुमच्या भेटी
तहान तुमची भागविण्या
बाग फुलवण्यासाठी…

पर्वतराजीचे घर सोडिता
नाही वळून पाहिले
पुढेच जाणे एवढेच ठाऊक
जगणे हेच मानले…

नाही कसली खंत मनी
दु:ख उरी ना कसले
एकाच जागी थांबून कधी
कुढत नाही बसले…

वाटेमधल्या अडचणींतून
मार्ग काढीत आले
कधी संथ, कधी धावत
तुम्हास येऊन भेटले…

गावाशिवाला वळसा घालून
पुढच्या कामी निघाले
रानावनाला भेटूनी अखेर
सागरास मी मिळाले…

गावोगावी आजही जेव्हा
गुणगुणतात माझी गाणी
त्या गाण्यातून वाहते माझ्या
आयुष्याची कहाणी…

काव्यकोडी : एकनाथ आव्हाड

१) कमकुवत अंगामुळे
ताट उभी नसते
कशाचाही आधाराने
ती वाढत बसते

पानं, फुलं, फळं
येतात तिला खूप
सांगा बरं कुणाचं
हिरवंगार रूप?

२) काटेरी अंग तरी
आतून फार गोड
बरका असो, कापा असो
त्याला नाही तोड

पोटात त्याच्या असतात
खूप खूप गरे
कोकणातला ढेरपोट्या
हा कोण बरे?

३) वसईची, जळगावची
असतात ही मस्त
काहीजण एक डझन
करून टाकी फस्त

शरीराला धष्टपुष्ट
करतात ती खरं
पण सालीपाशी कोणाच्या
जपा तेवढं बरं?

उत्तरे :-

१) वेल

२) फणस

३) केळी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -