Monday, May 13, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यस्त्रीत्वाचा आदर करा

स्त्रीत्वाचा आदर करा

मीनाक्षी जगदाळे

ऑनलाइन प्रेमप्रकरणात दोन्ही बाजूने सगळ्या स्टेप्स इतक्या पटापट घेतल्या जातात की, ते नातं निभावण्याची दोघांची कितपत मनापासून इच्छा आहे, हे जाणून घेणं याला वेळच दिला जात नाही…

सोशल मीडिया हाताळताना महिलांना अनेक विचित्र अनुभव येत असतात. महिला रात्रीच्या वेळी कोणत्याही अॅपवर ऑनलाइन दिसली की, तिच्याबद्दल चुकीचाच विचार पुरुषाच्या मनात का यावा? ती रात्री-अपरात्री कोणाशी तरी चॅटिंगच करीत असेल किंवा रात्री ऑनलाइन आहे म्हणजे कोणाशीही गप्पा करायला उपलब्ध असेल, अशीच विचारसरणी आढळते. कोणत्याही स्त्रीला दिवसभरच्या घरातील, ऑफिसमधील कामातून रात्री निवांत वेळ मिळाला म्हणून ती काही आवडीच्या पोस्ट वाचत असेल, काही नवीन शिकत असेल. एखादी स्त्री रात्री जागून आपल्या पाल्याचा अभ्यास घेताना काही माहिती मोबाईलवर शोधत असेल किंवा एखादी स्त्री आपल्या पतीसोबत, कुटुंबासोबत दिवसभरात आलेल्या काही विनोदी पोस्ट, वैचारिक पोस्टचा आस्वाद घेत असेल अथवा कोणतं तरी महत्त्वाचं वैयक्तिक काम मोबाईलवर करीत असेल! पण इतका परिपक्व विचार आपल्या समाजात स्त्रीच्या बाबतीत केला जात नाही, हे दुर्दैव आहे. रात्री ऑनलाइन दिसणाऱ्या स्त्रीला ताबडतोब ‘हाय’, ‘हॅलो’, ‘झोपली नाहीस का?’, ‘झोप येत नाही का?’, ‘बिझी आहात का?’ असे बालिश मेसेज पाठवून ती आता रात्रभर संबंधित व्यक्तीशी चॅटिंग करणारच आहे, असा समज करून घेतला जातो.

महिलांनी कोणतेही अॅप वापरताना अशा कोणत्याही ओळखीच्या अथवा अनोळखी व्यक्तीला कोणत्या वेळेस किती एंटरटेन करायचं, हे ठरवणं आवश्यक आहे. कारण इथूनच संबंधित महिलेबाबतचे पहिले मत बनवले जाते आणि पुढचा त्रासदायक प्रवास वर्षानुवर्षे करावा लागू शकतो. बहुतांश स्त्रियांचं भावविश्व खूप मर्यादित असत. कथा, कादंबरी, सिनेमानुसार प्रेमाच्या भाबड्या संकल्पना त्यांच्या डोक्यात असतात; परंतु प्रॅक्टिकली बाहेरचं जग किती फास्ट फॉरवर्ड झालंय, रिलेशनशिप किती तकलादू झाल्या आहेत, हे त्यांनी वेळेत समजून घेणं आणि स्वतःच्या काल्पनिक विचारशक्तीला आवर घालणं महत्त्वाचे आहे. काही सकारात्मक आऊटपूट निघू शकेल, खरोखरच मानसिक शांती लाभेल, हक्काचं, प्रेमाचं, समजून घेणारं, फक्त शारीरिक नाही तर वैचारिक, भावनिक दृष्टीने आपला विचार करणारं, सुख दुःखात बरोबरीने साथ देणारं, आपला आदर करणारं आणि आपला आत्मसन्मान जपणारी व्यक्ती जर अशा नात्यात लाभत असेल, तर आणि तरच महिलांनी याबाबतीत विचार करावा.

कोणत्याही गोष्टीला अपवाद हा असतोच. समाजातील काही टक्के महिला या पुरुषांना स्वतःहून आकर्षित करणाऱ्या, त्यांचा आर्थिक फायदा घेणाऱ्या, एकाशीही प्रामाणिक न राहता निव्वळ स्वार्थासाठी अनेक पुरुषांशी सलगी करणाऱ्या असू शकतात. श्रीमंत पुरुषाशी मैत्री करून, ती पुढे नेऊन, त्याच पुरुषाला ब्लॅकमेल करणे, त्याच्याकडे विविध मागण्या करणे, त्याने त्या पूर्ण केल्या नाहीत तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल अशा धमक्या देणे, मुद्दाम स्वतःच्या जाळ्यात सभ्य, सुसंस्कृत, सुशिक्षित, उचभ्रू पुरुषाला सोशल मीडियामार्फत आपल्या मोहपाशात अडकवणे यात देखील महिला सक्रिय आहेत.

पुरुषांकडून अनैतिक मार्गाने पैसे उकळण्यासाठी देखील सोशल मीडियाचा चुकीचा वापर महिला करताना दिसतात. अनेक चांगल्या घराण्यातील, नावलौकिक असलेले पुरुष अशा महिलांच्या प्रलोभनातून स्वतःला वाचवण्यास असमर्थ ठरतात. पण अशा ठरावीक महिलांमुळे सर्वच महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन दूषित होतोय. सर्वसामान्य महिलेला देखील त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. अशा ठरावीक वर्गातील महिलांसोबत समस्त स्त्री जातीलच पुरुष चुकीच्या अर्थाने पाहतो आणि तिला इतकी खालच्या दर्जाची वागणूक मिळते, ज्याची तिने कधी कल्पना केलेली नसते.

पुरुष कोणत्याही महिलेला ओळखताना कोणता निकष लावतो, हे त्याच्या वैयक्तिक विचारसरणीवर आणि कुवतीवर अवलंबून असते. त्याच्या पूर्व अनुभवावर अवलंबून असते किंवा त्याने आजूबाजूला पाहिलेल्या उदाहरणांवर त्याच महिलेविषयीचं मत तो ठरवत असतो. सगळेच पुरुष सारखे नसतात हेही तितकंच सत्य आहे. पण त्यांना कोणताही कटू अथवा अप्रिय अनुभव कोणत्याही स्त्रीकडून आलेला असेल, तर तो प्रत्येक वेळी, प्रत्येक स्त्रीला त्याच मापात तोलू शकतो. त्यामुळे समस्त महिला वर्गाची ही नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे की, आपण समाजात ताठ मानेने जगू शकू, आपल्या घराण्याचे नाव मोठे करू शकू, यावर काम करावे. एखादी स्त्री जेव्हा बदनाम होते तेव्हा ती तिच्या माहेरच्या, सासरच्या, स्वतःच्या कुटुंबाला देखील अप्रत्यक्षपणे बदनाम करीत असते. आपल्या मुलांना त्यांच्या मित्र परिवारात, आपल्या नवऱ्याला त्याच्या गणगोतात मान खाली घालायला लागेल, असे वर्तन आपल्या हाताने होणार नाही, याचा सर्वतोपरी प्रयत्न महिलांनी करणे अपेक्षित आहे. त्यामुळेच कोणत्याही माध्यमातून प्रकट होताना स्त्रियांनी सुद्धा आपल्यातील स्त्रीत्वाचा कोणीही सहजासहजी अपमान करणार नाही, आपल्याबद्दल चुकीचे समज करून घेणार नाही आणि आपला, आपल्या भावनांचा गैरवापर करून घेणार नाही, आपण स्वतःच्या नजरेत उतरणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.

meenonline@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -