Monday, May 20, 2024
Homeमहत्वाची बातमी‘सह्याद्री’ची पन्नाशी : कात टाकण्याची गरज!

‘सह्याद्री’ची पन्नाशी : कात टाकण्याची गरज!

वैजयंती कुलकर्णी-आपटे

एखादी व्यक्ती जेव्हा ५० वर्षांची होते, तेव्हा त्याचे मोठे सेलिब्रेशन केले जाते. ५०वा वाढदिवस अगदी दणक्यात होतो. काही जणांना आता आपली ही सेकंड इनिंग आहे, असे वाटते. अनेकजण या टप्प्यावर स्वेच्छानिवृत्ती स्वीकारतात आणि आपल्याला हवे तसे आता जगू द्या, असा विचार करतात. पण एखाद्या संस्थेची जेव्हा पन्नाशी होते, तेव्हा त्याचे सिंहावलोकन केले जाते. गेल्या ५० वर्षांत काय केले आणि आता पुढे काय करायचे आहे, याचा विचार होतो. सध्या मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीने ५०व्या वर्षांत पदार्पण केले आहे. अनेक मराठी वाहिन्यांच्या भाऊगर्दीत सध्या ही सह्याद्री वाहिनी हरवल्यासारखी वाटते. पण एक काळ असा होता, तेव्हा फक्त दूरदर्शन ही एकच वाहिनी होती आणि मुंबईतले सर्व भाषिक प्रेक्षक या वाहिनीवरचे कार्यक्रम आनंदाने पाहायचे.

सध्या एका भाषेच्या अनेक वाहिन्या, त्यातच क्रीडाविषयक वेगळी वाहिनी, लहान मुलांच्या वेगळ्या वाहिन्या, अगदी अध्यात्माच्याही स्वतंत्र वाहिन्या, अशा या शेकडो वाहिन्यांच्या जंजाळात, सर्वात जुनी म्हणजे आता पन्नाशी गाठलेली ही दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी आपला चेहरा हरवून बसली आहे. या पन्नाशी गाठलेल्या, मुंबईतील वाहिनीचे सिंहावलोकन करायचे झाल्यास सध्या वयाची पन्नाशी गाठलेल्या पिढीची सांस्कृतिक आणि भावनिक जडण-घडण या सह्याद्री वाहिनीच्या अनेक दर्जेदार कार्यक्रमांमुळे झाली हे मान्य करावेच लागेल.

भारतात १९५९मध्ये दूरदर्शन सुरू झाले आणि मुंबई दूरदर्शनचा प्रारंभ २ ऑक्टोबर १९९२ रोजी झाला. अर्थात त्यावेळेस रंगीत टीव्ही संच नव्हते, तर ब्लॅक अँड व्हाइटचा जमाना होता. घरात टीव्ही असणं हे स्टेट्स सिम्बॉल होतं. तेव्हा घरावर एक अँटीना असायचा, त्यावर कावळा, कबुतर बसले की, चित्रं अस्पष्ट दिसायची. मग त्यांना उडवून लावायला धावपळ सुरू. पावसाळ्यात वाऱ्यामुळे तो अँटिना फिरायचा, मग घरावर चढून तो पुन्हा नीट करायचे.

त्या टीव्हीचं इतकं अप्रुप होतं की, भाषा कळत असो वा नसो किंवा आपला त्या विषयांशी संबंध असो वा नसो, पण समोर बसून राहायचं हाच एककलमी कार्यक्रम.  कार्यक्रम मराठीत, हिंदीत असो की, गुजराती बघत बसायचं. मराठी कार्यक्रम म्हणजे ‘गजरा’, जे आजकाल कॉमेडीच्या नावाखाली चालतात तसे, पण ‘गजरा’ कार्यक्रमाची पातळी खूप वरची होती, अश्लील विनोद नव्हते. यामध्ये बबन प्रभू यांच्यापासून सुरेश भागवत यांच्यापर्यंत सगळ्यांचीच हजेरी असायची, ‘हास परिहास’ हा तसाच एक होता. याशिवाय ‘आमची माती, आमची माणसं’, ‘छायागीत’, ‘चित्रहार’ अन् अभिनेत्री तब्बसुम यांचा ‘फुल खिले है गुलशन गुलशन’ ते अगदी गुजरातीमध्ये ‘संता कुकडी’, ‘घेर बेठा’, ‘आवो मारी साथे’ तसेच हिंदीमध्ये ‘सुरभी’ जे सिद्धार्थ काक व रेणुका शहाणे निवेदन करायचे, ‘आरोग्य धनसंपदा’ हे डॉ. जीवन मोहाडीकर सूत्रसंचालन करायचे, असे असायचे.

याशिवाय, सबिरा मर्चंट व आदी मर्जबान यांचा What’s the good word हा ‘कोर्टाची पायरी’ यात वकील व न्यायाधीश मंडळी सहभागी होत असत.

डॉ. सुहासिनी मुळगावकर या विविध क्षेत्रांतील लोकांच्या या मुलाखती घ्यायच्या, याशिवाय ‘साप्ताहिकी’ म्हणजेच पुढील आठवड्यात काय काय कार्यक्रम असणार, यावर आधारित कार्यक्रम करायच्या. तोही न चुकता बघितला जायचा. त्यावेळचे निर्माते म्हणजे विनय आपटे, विनायक चासकर, विनय धुमाळे, सुहासिनी मुळगावकर, विजया धुमाळे, किरण चित्रे, माधवी मुटाटकर, नैना राऊत, अरुण काकतकर अशा दिग्गज निर्माते आणि त्यांचे प्रमुख केशव केळकर यांनी दर्जेदार कार्यक्रमनिर्मिती करून मराठी दूरदर्शनला एक अव्वल स्थान मिळवून दिले होते. याच वाहिनीने सुधीर गाडगीळ आणि मंगला खाडीलकर यांच्यासारखे निवेदक तयार केले.

पण सर्वांसाठी आवडीचा एक कार्यक्रम होता, तो म्हणजे बातम्या. कारण त्या लिमिटेड होत्या. वृत्तनिवेदक व निवेदिका यांची एक भरभक्कम फळी होती. मराठी, हिंदी चित्रपटात ज्यांनी आपला अभिनयाचा ठसा उमटवला त्या स्व. स्मिता पाटील, याशिवाय भक्ती बर्वे, शोभा तुंगारे, स्मिता तळवळकर, ज्योत्स्ना किरपेकर, त्याचप्रमाणे प्रदीप भिडे, अनंत भावे हे पुरुष निवेदक, सगळेच अर्थात उत्तम प्रकारे बातम्या सांगायचे. आजकाल जे आरडाओरड करून ‘हमारे चॅनल पे पहली बार’, ‘ब्रेकिंग न्यूज’ असलं काही नव्हतं.

दूरदर्शनची पहिली मराठी विनोदी मालिका, ती म्हणजे चिं. वी. जोशी यांच्या लेखनावर आधारित ‘चिमणराव आणि गुंड्याभाऊ’ (वर्ष साधारण १९७९/८०). चिमणराव आणि गुंड्याभाऊ; मोरू, मैना, सोबत काऊ… असं काहीसं ते सुरुवातीचं गीत असायचं, पण ही मालिका खूप प्रसिद्ध झाली. चिमणराव यांच्या भूमिकेत दिलीप प्रभावळकर, जे खरं तर त्यानंतर नावारूपाला आले. बाळ कर्वे हे गुंड्याभाऊ होते. नंतर आलेली ‘चाळ नावाची वाचाळ वस्ती’. विनय आपटे यांची निर्मिती असलेल्या या मालिकेत अगदी सुलोचनाबाई, अशोक सराफ, दिलीप कुलकर्णी, उषा नाडकर्णी, नैना कुलकर्णीपासून अगदी सचिन खेडेकर, संजय नार्वेकरपर्यंत कलाकार होते. त्या मालिकेनेही लोकप्रियतेचा उच्चांक गाठला.

पण एक होतं की, लिमिटेड वेळ असला तरी सर्व भाषांना, प्रांतांना समान वाटा मिळायचा. ती खरी राष्ट्रीय एकात्मता होती. आता प्रत्येक भाषेचा, प्रांताचं वेगळं चॅनल असतं. याशिवाय पूर्वी खेळांसाठी World of Sports, Sports round up हेही होते. नरोत्तम पुरी, फ्रेद्यून दी वित्रे हे पारसी गृहस्थ, व्यवसायाने वकील (मुंबई उच्च न्यायालयात), त्याचबरोबर दिलीप सरदेसाई (पत्रकार राजदीप सरदेसाई यांचे वडील), विजय मर्चंट, पॉली उम्रीगर, राजसिंह डुंगरपूर हेही असायचे. क्रिकेटसाठी नॅशनल नेटवर्कवर गाजलेल्या दोन मालिका म्हणजे ‘हम लोग’ व ‘बुनियाद’. याशिवाय हिंदी चित्रपट अभिनेते बलराज साहनी यांचे भाऊ लेखक भीष्म साहनी यांच्या लेखनावर व भारत-पाकिस्तान फाळणीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर आधारित मालिका ‘तमस’; ज्यात ओम पुरी, दीपा साही व अन्य कलावंत होते.

याशिवाय त्या काळात गाजलेल्या मालिका म्हणजे ‘अलिफ लैला’, आर. के. नारायण लिखित ‘मालगुडी डेज’, ‘श्रीमान-श्रीमती’, श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेली ‘भारत एक खोज’, शाहरूख खान यांची मालिका होती, ‘सर्कस’ व दुसरी ‘फौजी’.

असो. गेल्या ५० वर्षांच्या कार्यक्रमांबद्दल बोलावे, तेवढे थोडेच आहे. आज शेकडो वाहिन्यांमुळे ही एक मोठी इंडस्ट्री झाली आहे. लाखो लोकांना रोजगार मिळतो आहे, पण पन्नाशीनंतर मुंबई दूरदर्शनने कात टाकण्याची गरज आहे. सगळी अद्ययावत यंत्रसामग्री उपलब्ध असताना, इतर मराठी वाहिन्यांच्या तुलनेत आज दूरदर्शन मागे का? खरे तर गरज आहे, ती सरकारी मनोवृत्ती बाजूला सारून पूर्वीसारख्या दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती करणाऱ्या सर्जनशील मनुष्यबळाची.

vaiju3@yahoo.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -