Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीReading inspiration day : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींच्या पिंपळनेर गावी साजरा होणार ‘वाचन...

Reading inspiration day : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींच्या पिंपळनेर गावी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’

मराठी भाषा विभागाचा उपक्रम

मुंबई : माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने त्यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन (Reading inspiration day) म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी मराठी भाषा विभागाच्यावतीने १२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान राज्यभर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर (ता.साक्री) या मूळ गावी, तसेच आदिवासी भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठी भाषा व साहित्य यांच्या विकासासाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या धर्तीवर ‘मराठी विश्वकोश’ सारखा सर्व विषयसंग्राहक असा संदर्भ ग्रंथ तयार करण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा’ची स्थापना करण्यात आली. या मंडळाच्यावतीने संदर्भग्रंथाचे ज्ञान सातत्याने अद्ययावत ठेवण्याचे तसेच वाचकांची जिज्ञासा जागृत ठेवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मराठी विश्वकोश ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने यावर्षी तर्कतीर्थांच्या मूळ गावी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येत आहे.

पिंपळनेर येथे लोकमान्य टिळक ग्रंथालयाच्या सहकार्याने दि. १२ ऑक्टोबरला सायं. ५ वाजता मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजा दीक्षित व सचिव डॉ.श्यामकांत देवरे यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांसोबत ‘वाचन संवाद‘ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर्कतीर्थाचे मूळ निवासस्थान, त्यांनी शिक्षण घेतलेली जिल्हा परिषद शाळा व टिळक ग्रंथालय या ठिकाणी मान्यवर भेटी देतील. दि. १३ रोजी सकाळी १० वाजता कर्मवीर आ.मा.पाटील महाविद्यालयात ‘वाचन संस्कृतीची जोपासना‘ या विषयावर डॉ.दीक्षित मार्गदर्शन करतील, तर दुपारी १ वाजता साक्री तालुक्यातील पानखेडा या आदिवासी बहुल गावात दीपरत्न माध्यमिक विद्यालयाच्या सहकार्याने आदिवासी बांधवांसमवेत ‘ओळख मराठी विश्वकोशाची’ हा संवादात्मक कार्यक्रम होईल, असे विश्वकोश निर्मिती मंडळ कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -