Saturday, May 18, 2024
Homeब्रेकिंग न्यूजRaj Thackeray : शिक्षकांना पाठींबा देत राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल

Raj Thackeray : शिक्षकांना पाठींबा देत राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल

निवडणूक आयोग पाच वर्षे काय करत असतो

निवडणुकीचे काम करु नका, कोण कारवाई करतो ते बघतोच

मुंबई : येत्या काही दिवासात देशासह राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यासाठी शिक्षकांना निवडणुकीच्या कामात (Election Duty) जुंपण्यावरुन मनसे (MNS) पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिक्षकांना पाठींबा देत थेट निवडणूक आयोगालाच (Election Commission) आव्हान दिले आहे.

शिक्षक निवडणुकीच्या काळात कामं करण्यासाठी आहेत का? निवडणूक आयोग पाच वर्षे काय करत असतो, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. आतापासून निवडणूक आयोगाने शिक्षकांना सांगितले आहे, रुजू व्हा. पुढील तीन महिने शिक्षक त्यांना हवेत, हे शिक्षक कशासाठी हवेत? मी दादरच्या शारदाश्रम शाळेतील शिक्षकांना सांगितले आहे की, तुम्ही निवडणुकीच्या कामासाठी रुजू होऊ नका. तुमच्यावर कोण काय कारवाई करते, ते मी पाहतो, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाला पाच वर्षात यंत्रणा उभी करता येत नाही का? ही पहिली निवडणूक आहे का, किती लोकं लागणार, ते तुम्हाला माहिती नाही. शिक्षकांचे काम विद्यार्थ्यांना शिकवणे हे असते. निवडणूक आयोग शिस्तभंगाची कारवाईची भीती दाखवतो. उलट आयोगावरच कारवाई केली पाहिजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

शिक्षकांना निवडणुकीच्या कामात जुंपल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची कैफियत शारदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी राज ठाकरेंकडे मांडली. यावर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली. मुंबईतील चार हजार १३६ शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी बाहेर काढले आहे, मग शाळेतील मुलांना शिकवणार कोण? निवडणूक आयोग इतक्या घाईगडबडीत सर्व काम करुन शाळेवर दडपण का आणत आहेत? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.

प्रत्येक वेळी नवं काहीतरी आणायचं आणि वाद ओढावून घ्यायचा. शिक्षक हे विद्यार्थ्यांना शिकवायला आले आहेत. पण यात विद्यार्थ्यांची चूक काय आहे. शिक्षकांनी कुठेही रुजू होऊ नये. विद्यार्थ्यांना घडवणं त्यांचं काम आहे, निवडणुकीची तयारी करणं त्यांचं काम नाही. शिक्षकांवर कोण शिस्तभंगाची कारवाई करतेय ते मला पहायचं आहे, असे राज म्हणाले.

हे फक्त झुलवणे आणि भुलवण्याचे काम सुरु आहे

यावेळी राज यांना मराठा आरक्षणासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, या अधिवेशनामुळे काही होणार नाही. हा विषय राज्याचा नसून केंद्रातील आणि सर्वोच्च न्यायालयातील आहे. या आरक्षणात तांत्रिक त्रुटी असून, त्या सुटल्याशिवाय हाताला काहीच लागणार नाही. सध्या फक्त या मुद्द्यावरून झुलवलं आणि भुलवलं जात असल्याचेही राज यावेळी म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -