Sunday, May 19, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यपाऊस, ऊन, वारा आणि कोकण!

पाऊस, ऊन, वारा आणि कोकण!

संतोष वायंगणकर

कोकण म्हटलं की, कुणाच्याही डोळ्यांसमोर येतो तो निसर्गसौंदर्यांने नटलेला, थाटलेला प्रदेश. स्वप्नवत वाटणारा निसर्गाचा सारा थाटमाट म्हणजेच कोकण. या कोकणात काय पिकत नाही इथे सारं काही पिकतं. म्हणूनच महाराष्ट्रभरातील इतर प्रांतातील जनतेला कोकणच भारी अप्रुप वाटत राहतं. आंबा, काजू, कोकम, जांभूळ, करवंद आणि समुद्रातील मासे अशी सारी निसर्गसंपत्ती परमेश्वराने मुक्तहस्ताने कोकणाला बहाल केली आहे; परंतु कोकणवासीयांचे दुर्दैव असे आहे की, ‘तुझे आहे तुजपाशी; परंतु जागा चुकलाशी’ अशीच काहीशी स्थिती आपली झालेली आहे. मृगाकडे असलेल्या कस्तुरीचं त्यालाच कळत नाही. आपल्याकडे नेमकं काय आहे. नेमकेपणाने तीच स्थिती आपल्या कोकणवासीयांची आहे. कोकणाचं राजकारणही फार कोत्यावृत्तीचं. दुसऱ्याच्या कर्तृत्वाची मोठी असलेली रेषा छोटी दिसण्यासाठी आपलं कर्तृत्व तेवढे मोठं काम आपण करायला पाहिजे ना; परंतु संकुचित मनाची माणसं आभाळाएवढा विचारही करीत नाहीत आणि तेवढं कर्तृत्व दाखवण्याची कुवतही नाही. यामुळे मोठ्या कर्तृत्वानं रेषेशी स्पर्धा करण्याची हिम्मत आणि कुवत दोन्ही नसल्याने त्या मोठ्या असलेल्या रेषेशी स्पर्धा करू न शकलेले केवळ त्या रेषेकडे पाहून फक्त टीका करीत बसतात; परंतु यांना एक कळत नाही. स्पर्धा कामाशी करायची असते. हिमालयाचा कधी डोंगर होत नसतो. हिमालय जर कुणाला डोंगर दिसत असेल, तर हिमालय आपल्या नजरेत सामावण्याची, त्याकडे पाहण्याची आपली दृष्टी नाही. हा दृष्टी दोष म्हणावा लागेल. हा दृष्टी दोष दूर केला पाहिजे. तरच या कोकणाला अधिक सौंदर्य प्राप्त होईल. विचारांची चौकट आणि मर्यादा आपणच आखून घेतल्या की साऱ्याच चांगल्या गोष्टीही आपणाला पाहता येत नाहीत. तो नकारात्मकतेचा दृष्टी दोष असतो.

सकारात्मकता व्यक्तीला आणि समाजाला पुढे घेऊन जाते. निसर्गाचं गेली काही वर्षे बदलत असलेलं स्वरूप आंबा, मासे, कोकम, काजू या सर्वांच्या मुळाशीच आलंय. निसर्ग इतका दोलायमान झालाय. गेले वर्षभर एखाद्या महिन्याचा अपवाद वगळता पाऊस पडतोय. कोकणातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील शेतकरी अंदाजच बांधू शकत नाहीत. यामुळे या वर्षी कोकणातील आंबा, काजू, कोकम बागायतदार अडचणीत सापडला आहे. आंबा बागायतदारांना पावसाच्या या बदलत्या वातावरणाचा फटका बसला आहे. अनेक बागायतदारांनी आंबा कॅनिंगला घातला. कोकणातील बहुतांश भागातील ही वस्तुस्थिती आहे. काजू ‘बी’चा दर थोडासा वाढला. पण पुन्हा घसरला. यावर्षी जांभूळ, करवंद यांचं दर्शनही कोकणला घडल नाही.

जांभूळचा मोठा व्यवसाय चालतो. मुंबई, पुण्याच्या बाजारात कोकणातील जांभळांना मोठी मागणी असते; परंतु जांभळांचे उत्पादनही झाले नाही. पावसावरतीच जांभूळ, करवंद आणि कोकमचं पीक अवलंबून असतं. तयार झालेल्या करवंदांवर एक पाऊस पडला तरी ती करवंद खाण्यायोग्य राहात नाहीत. यामुळे अधून-मधून पाऊस पडत राहिला. यामुळे करवंद झाडावरच (झाळींवरच) खराब झाली. लोकांसमोर यावर्षी करवंद कुठे आलीच नाहीत. मध्येच आलेल्या कडक उन्हांचा परिणामही झाला. यामुळे आंबा, काजू खराब झाले. आंबे तर आतून खराब आणि बाहेरूनही त्यावर डाग होते. यामुळे आंब्याच्या सौंदर्यावर आणि स्वादिष्टतेवरही त्याचा परिणाम झाला. वाराही तसाच आहे. या कोकणातील वाऱ्याने झाडांवर तयार झालेल्या फळांचा सडा पडला. यामुळे नुकसान व्हायचे ते झाले. निसर्गाची सध्या जगालाच साथ नाही. निसर्गाच्या अनियमिततेचा फटका सर्वांनाच बसतोय. त्यामुळे आपणच या सर्वच बाबतीत योग्य प्रकारे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. कलिंगड पिकवणाऱ्या बागायतदार शेतकऱ्यांचे गेली चार ते पाच वर्षे नुकसान होते.

तसे ते यावर्षीही झाले आहे. खरं तर कोकणातील शेतकरी चार ते पाच वर्षांतील नुकसानीने हैराण झाला आहे; परंतु पुढच्या वर्षी नुकसान भरून निघेल या एकाच आशेच्या किरणाने तो पुन्हा उभा राहातो. काही नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो. कलिंगडाची लागवड करणारा बागायतदार कधीच आपलं दु:ख घेऊन येत नाही. कलिंगडाच्या नुकसानीने त्याच्या डोळ्यांतील पाणीही आटले आहे. कोकणातील या साऱ्या बागायतदार शेतकऱ्यांनी यावर्षी नाही पुढच्या वर्षी चांगलं पीक येईल आणि नुकसान भरून येईल याच सकारात्मकतेने कोकणात येणारा अवकाळी पाऊस, पडणारं कडक ऊन आणि सोसाट्याचा वारा सहन करीत आहे.

santoshw2601@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -