Tuesday, May 21, 2024
Homeमहामुंबईराहुल गांधींच्या अध्यक्षपदाला पृथ्वीराज चव्हाण यांचा उघड विरोध

राहुल गांधींच्या अध्यक्षपदाला पृथ्वीराज चव्हाण यांचा उघड विरोध

४४ आमदारांपैकी जेमतेम १०-१५ आमदारच बैठकीला उपस्थित

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची नेमणूक करण्याचे सर्वाधिकार काँग्रेसच्या अध्यक्षांना देण्यापासून राहुल गांधी यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेमण्याच्या ठरावावर बैठकीला उपस्थित असलेले नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उघडपणे विरोध केला, तर अनेक नेत्यांनी बैठकीलाच दांडी मारल्याचे वृत्त आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक सोमवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली. या बैठकीला प्रदेश निवडणूक अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, प्रांताध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी नेते उपस्थित होते.

या बैठकीत दोन ठराव एकमताने मंजूर करण्यात आल्याचे बैठकीनंतर जाहीर करण्यात आले. पण, प्रत्यक्षात हे दोन्ही ठराव मांडल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठरावाच्या बाजूने हात वर करून कौलच दिला नाही, तर यशोमती ठाकूर, सतेज पाटील, वर्षा गायकवाड, अस्लम शेख, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे, अमित देशमुख, त्यांचे बंधू आमदार धीरज देशमुख आदी नेते बैठकीला हजरच राहिले नव्हते. काँग्रेसच्या ४४ आमदारांपैकी जेमतेम १०-१५ आमदारच या बैठकीला उपस्थित होते, असे सूत्रांनी सांगितले.

भाई जगताप यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून लवकरच डच्चू मिळणार असल्याचे समजते. त्यामुळे ते बैठकीकडे फिरकलेच नाहीत. विश्वजित कदम हे दोन्ही ठराव मंजूर झाल्यानंतर बैठकीच्या ठिकाणी दाखल झाले. विजय वडेट्टीवार आणि सुनील केदार बैठकीला हजर होते; परंतु मंचावर ते गेलेच नाहीत. या दोघांना मंचावर येण्यासाठी अनेकदा विनवणी करण्यात आली. मात्र, त्यांनी आपला निर्णय बदलला नाही, असे समजते.

प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कोषाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी यांच्या निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्षांना देण्याचा ठराव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडला. विधिमंडळ काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. सर्व प्रदेश प्रतिनिधींनी हा ठराव एकमताने मंजूर केला.

काँग्रेस अध्यक्षपदी खासदार राहुल गांधी यांची नियुक्ती करावी, असा ठराव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मांडला. प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. हा ठराव सर्व प्रतिनिधींनी एकमताने मंजूर केला, असे बैठकीनंतर सांगण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -