Friday, May 17, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यमराठवाड्यात मतांचे ध्रुवीकरण निश्चित

मराठवाड्यात मतांचे ध्रुवीकरण निश्चित

मराठवाडा वार्तापत्र : अभयकुमार दांडगे

सर्वसामान्यांच्या मनात काय चालू आहे, हे ओळखायचे असेल, तर सोशल मीडिया हे सर्वोत्तम माध्यम आहे. सोशल मीडियावर अलीकडच्या ज्वलंत मुद्द्यांवर कशी चर्चा चालू आहे, यावर एक नजर टाकली, तर लोकांच्या मनात कोणाबद्दल काय भावना आहेत, हे लगेच लक्षात येते. पूर्वीच्या काळात ग्रामीण भागात एकमेकांचे मत जाणून घेण्यासाठी चावडीवर गप्पा रंगत असत; परंतु आता ग्रामीण भागातूनही चावडी हद्दपार झाली आहे. सोशल मीडियावरूनच एकमेकांचे मत जाणून घेतले जात आहेत. असाच काहीसा मराठवाड्याबद्दलचा अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्षात येत आहे.

मराठवाड्यात अलीकडच्या काळात बऱ्याच राजकीय उलथापालथ झाल्या. यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असले तरी मराठवाड्यातील मतदार मात्र आता संभ्रमात पडला आहे. यामुळे मराठवाड्यात मतांचे ध्रुवीकरण होणार हे तेवढेच निश्चित मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी राजकीय आखाड्यात कोण उतरणार, याची रंगीत तालीम सर्वच राजकीय पक्षांकडून व्यक्त केली जात आहे. यासाठी ग्रामीण भागात मकर संक्रांतीपासून वेगवेगळे सोहळे आयोजित करून महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांच्या पत्नी व महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने वाण लुटण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत, तर मराठवाड्यात त्यांपैकी ८ जागांवर लोकसभा निवडणूक होत असते. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव अर्थात उस्मानाबाद व बीड या आठ लोकसभा मतदारसंघांतून निवडणूक कोणकोणते पक्ष लढवणार व त्यामध्ये प्राबल्य कुणाचे असेल? यावरून मराठवाड्यात चर्चेला उधाण आले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या बाबतीत बोलावयाचे झाले, तर त्या ठिकाणी आजघडीला एमआयएमचे इम्तियाज जलील हे खासदार असले, तरी त्या ठिकाणी मुस्लीम मतदारांची संख्या जास्त व हिंदू मतांची पुन्हा विभागणी होणार असल्यामुळे तेथे यंदा काय चमत्कार होईल, हे तेथील मतदारच ठरवतील. भाजपाने डॉ. भागवत कराड यांना केंद्रीय अर्थराज्यमंत्री पदावर नेमून त्या ठिकाणी भाजपाचे प्राबल्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

या जिल्ह्याला लागूनच असलेल्या जालना लोकसभा मतदारसंघातील खासदार रावसाहेब दानवे यांनी रेल्वे राज्यमंत्री म्हणून केंद्रात मराठवाड्यातील रेल्वेविषयक कामांना चालना दिली आहे. जालना जिल्ह्यातील एक काँग्रेसचे आमदार भाजपामध्ये प्रवेश करतील, या चर्चेमुळे जालना लोकसभा मतदारसंघातील मतदार संभ्रमात आहेत. नेतेमंडळी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात असले, तरी कार्यकर्ते व मतदार मात्र वेगवेगळ्या चर्चा करून राजकीय नेत्यांबद्दल खासगीत नाराजी व्यक्त करीत आहेत.

परभणी लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व उबाठा गटाचे बंडू जाधव हे करीत आहेत. हा जिल्हा उबाठांच्या संपर्कात जास्त असल्यामुळे येथील राजकीय घडामोडी काहीशा वेगळ्या दिसून येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात परभणी जिल्ह्यातील काही कार्यकर्ते असल्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कोणता पक्ष कोणाला उमेदवारी देईल? यावर परभणी लोकसभा मतदारसंघाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. परभणी जिल्ह्यातील मतदारदेखील कोण उमेदवार असेल? यावरून मताचे पारडे कोणाच्या झोळीत जातील, हे ठरणार आहे. या मतदारसंघात उमेदवार हाच सर्वात महत्त्वाचा विषय ठरणार आहे.

हिंगोली जिल्ह्यात सध्या शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील हे पुन्हा लोकसभा लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरून त्यांनी दिल्लीत संसद भवन परिसरात उपोषण देखील केले होते. तसेच आपल्या खासदारकीचा राजीनामाही त्यांनी दिल्लीत सभापतींकडे सादर केला होता. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा गड हा शिवसेनेकडे जास्त झुकलेला आहे. या लोकसभा मतदारसंघात बरीच उलथापालथ झाल्यामुळे येथील मतदार कोणत्या पक्षाला पसंती देतील, हे लक्षवेधक ठरणार आहे. मतदारांच्या भावना लक्षात घेणारा नेता हा सर्वात अगोदर पसंतीला उतरत असतो.

नांदेड लोकसभा मतदारसंघ हा सध्या भाजपाच्या तावडीत आहे. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे नांदेडचे नेतृत्व करत आहेत. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपात आल्यामुळे या ठिकाणी खासदार चिखलीकर यांना कोणीही दमदार विरोधक नसल्यामुळे पुन्हा भाजपाचा उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यात १६ तालुके आहेत. या ठिकाणी लोकसभेसाठी चित्र स्पष्ट असले, तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी कोणाला निवडून द्यावे, हा प्रश्नही सोशल मीडियावर चर्चेला येत आहे. शेवटी ‘जो जीता वो सिकंदर’ या म्हणीप्रमाणे कोण कुठून नेतृत्व करेल व किती मतांच्या फरकाने निवडून येईल याचा अंदाज राजकीय पक्षांना लागणार नाही. तसेच मतदारांनाही हा अंदाज लावणे कठीण ठरत आहे.

लातूर लोकसभा मतदारसंघ देखील भाजपाला समाधान देणारा ठरू शकतो. लातूर जिल्हा माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या नावाने ओळखला जातो. लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदार देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी तसेच भाजपाच्याही पाठीशी आहेत. या भागातील मतदारदेखील लोकसभेसाठी संभ्रमात आहेत, हे मात्र निश्चित.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला मानणारे मतदार जास्त संख्येने आहेत; परंतु यंदा शिवसेनेत दोन गट झाल्यामुळे येथील मतदार कोणाला पसंती देतील, हे आज सांगणे चुकीचे ठरेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी जास्त निधी देण्यावर भर देत असल्याने भविष्यात येथून कोण लोकसभेवर जाईल, हे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील मतदारदेखील ठोकपणे सांगू शकत नाहीत. एकंदरीत पाहता धाराशिव लोकसभा मतदारसंघातील मतदारही आज पूर्णपणे ब्लँक आहेत.

बीड लोकसभा मतदारसंघ भाजपाच्या तावडीत आहे. माजी मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग हा लोकसभेसाठी निर्णायक ठरत असतो. यंदा भाजपाकडून उमेदवारी देत असताना पंकजा मुंडे यांना विचारात घेतले जाईल, अशी राजकीय चर्चा आहे. त्या ठिकाणी मुंडे कुटुंबीय हे आजवर अग्रेसर ठरले, असा इतिहास आहे. धनंजय मुंडे हे राज्याचे कृषिमंत्री असले, तरी लोकसभेत कोणाला मतदान करायचे हे बीडमधील मतदारांना चांगल्याप्रमाणे ठाऊक आहे. बीड लोकसभेसाठी कोण कोण उमेदवार राहतील, यावरून तेथील मतदारांच्या मतांची विभागणी होईल, हेदेखील तेवढेच खरे आहे. मराठवाड्यातील या राजकीय परिस्थितीमुळे मतांचे मात्र ध्रुवीकरण होणार, हे निश्चित आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -