Saturday, May 18, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलPoems and Riddles : पाऊस झेलूया कविता आणि काव्यकोडी

Poems and Riddles : पाऊस झेलूया कविता आणि काव्यकोडी

  • कविता : एकनाथ आव्हाड

पाऊस झेलूया

आभाळात ढगांची दाटी झाली
अंधारून आले सभोवताली

वाऱ्याच्या ताशाला चढला जोर
पिसारा फुलवून नाचला मोर

ढगांनी वाचला पावसाचा पाढा
जमिनीवर पडला गारांचा सडा

वीजबाई चमकून पाहते खाली
झाडांना पाऊस अंघोळ घाली

पावसाचे पाणी वाहे खळखळ
मातीचा पसरे चौफेर दरवळ

पावसामुळे झाली बियांची पेरणी
साऱ्यांच्या ओठी पावसाची गाणी

झाडे-वेली हसली फुले
पाऊस झेलायला आली मुले

काव्यकोडी : एकनाथ आव्हाड

१) वाक्य पूर्ण झाले की
हमखास ते दिसते
शेवटच्या शब्दानंतर
ठासून ते बसते

संक्षिप्त रूपाच्या शेवटी
हेच वापरले जाते
सांगा बरं आता हे
विरामचिन्ह कोणते?

२) एकाच जातीचे शब्द
लागोपाठ आल्यास
दोन छोट्या घटना
वेगळ्या दाखवल्यास

संबोध दर्शवतानासुद्धा
नेमके दिसून येते
सांगा या विरामचिन्हाला
काय म्हणतात ते?

३) उत्कट भावना
व्यक्त करताना
हर्ष, आश्चर्य, दुःख
शब्दांतून सांगताना

शब्दाच्या शेवटी नेमके
हेच चिन्ह दिसते
सांगा या विरामचिन्हाला
काय म्हणतात ते?

उत्तर –
१) पूर्णविराम
२) स्वल्पविराम
३) उद्गारवाचक चिन्ह

eknathavhad23 @gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -