Monday, May 20, 2024

रोपटे

पूर्वा चौथीत शिकणारी चांगली हजरजबाबी मुलगी होती. पण तिला वाटायचं की, ही घरातली मोठी माणसं उगाचच सारखा उपदेश करीत असतात. त्याचा पूर्वाला खूप राग येई. त्यामुळे तिने ठरविले की, स्वतःच्या हिमतीवर आपण बक्षीस मिळवू आणि आई-बाबांच्या कौतुकाची थाप आपल्या पाठीवर घेऊ!

कथा – रमेश तांबे

पूर्वाच्या शाळेत एक अनोखी स्पर्धा भरवली गेली होती. प्रत्येकाने एका कुंडीत बी लावायचे. ज्याचे रोपटे तीस दिवसांत सर्वात जास्त उंच होईल, अशा तीन स्पर्धकांना बक्षिसे मिळणार होती. पूर्वाने विचार केला आपण स्पर्धेत भाग घेतला आहे हे कोणालाच सांगायचे नाही. पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळवून आपण आई-बाबांना आश्चर्याचा धक्का द्यायचा असेच तिने ठरवले होते.

पूर्वाने शाळेतून घरी येताना प्लास्टिकची कुंडी, लालमाती आणली होती. घराच्या पाठीमागे जाऊन तिने कुंडीत माती भरली. त्यात पाणी टाकून दोन बिया खोल मातीत घुसवल्या आणि कुंडी कुणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी म्हणजे एका जुन्या कपाटाखाली ठेवून दिली. कामगिरी फत्ते झाली म्हणून पूर्वा खूश होती.

पूर्वा लहान होती. चौथीत शिकणारी चांगली हजरजबाबी मुलगी होती. पण तिला वाटायचं, ही घरातली मोठी माणसं उगाचच सारखा उपदेश करीत असतात. त्याचा पूर्वाला खूप राग येई. त्यामुळे तिने ठरविले की, स्वतःच्या हिमतीवर आपण बक्षीस मिळवू आणि आई-बाबांच्या कौतुकाची थाप आपल्या पाठीवर घेऊ! ती रोज कुंडीत पाणी टाकू लागली. कसेही करून पहिल्या क्रमांकाचे बक्षीस आपणच मिळवायचे असा चंग तिने बांधला होता.

दोन-चार दिवसांतच एक छोटा हिरवा कोंब कुंडीत दिसू लागला. शाळेत आल्यावर प्रत्येक जण आपल्या रोपाविषयी एकमेकांना सांगायचे. कोणाचे रोप दोन इंच वाढले, तर कोणाचे वितभर झाले. पूर्वाला हे सारे खोटे वाटायचे. कारण पूर्वाच्या कुंडीत आता कुठे हिरवा कोंब दिसू लागला होता. पूर्वा रोज रोपाची खूप काळजी घ्यायची. कुंडी बाहेर काढून त्यावर पाणी शिंपडायची आणि कोणालाही दिसू नये म्हणून पुन्हा कुंडी कपाटाखाली सरकवायची! आता जवळजवळ दहा दिवस उलटून गेले तरी पूर्वाचे रोपटे वाढेनाच! ते खुरटलेलेच, छोटेसेच दिसत होते. तिच्या मैत्रिणींची रोपे मात्र भराभर वाढत होती.

आता मात्र पूर्वाला खूप काळजी वाटू लागली. ती विचार करतच घरी आली. कॉलनीत शिरताच तिला माळीकाका दिसले. ती म्हणाली, “काका, मी एका कुंडीत बी लावले आहे. त्याला रोज पाणी घालते. पण माझे रोप वाढतच नाही.” माळी काका म्हणाले, “पूर्वा चल मला दाखव तुझी कुंडी.” घराच्या मागे जाऊन कपाटाखाली लपवून ठेवलेली कुंडी तिने माळीकाकांना दाखवली. कुंडी बघताच माळीकाका जोरजोरात हसू लागले आणि पूर्वाला म्हणाले, “अगं ए वेडाबाई, कुंडी अशी लपवून ठेवतात का!” पूर्वा म्हणाली, “घरात कोणालाही कळू नये म्हणून लपवली!” आता मात्र काकांनी कपाळालाच हात लावला. पण काका, मी रोज त्याला पाणी घालते. माळीकाका म्हणाले, “अगं, एखाद्या रोपाच्या वाढीसाठी पाणी, खते याचबरोबर सूर्यप्रकाशाचीही खूप गरज असते हे विसरलीस वाटतं. आई-बाबांना कळू नये म्हणून ते रोपटे चक्क लपवून ठेवलेस! मग सूर्यप्रकाशाविना ते कसे वाढणार? सांग बरे!” आता मात्र पूर्वाच्या डोक्यात प्रकाश पडला. पूर्वा काकांना म्हणाली, “काका बरे झाले तुम्ही मला भेटलात. अजून वीस दिवस आहेत माझे रोप वाढले पाहिजे. माझा वर्गात पहिला नंबर यायला हवा.” मग माळीकाकांनी ती कुंडी उचलली. कुंडीतली माती हातातल्या विळ्याने सावकाश खाली वर केली. थोडे पाणी शिंपडून त्यात खतही टाकले आणि भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी कुंडी ठेवली अन् काय आश्चर्य पाच-सहा दिवसांतच पूर्वाचे रोपटे तरारून वाढले. माळीकाकांंनी रोज लक्ष दिल्याने पूर्वाचे रोपटे चांगलेच उंच झाले होते. स्पर्धेच्या दिवशी मोठ्या खुशीत पूर्वा कुंडी घेऊन शाळेत गेली. पूर्वाचे उंंचच उंच रोपटे बघून सारी मुले चकित झाली. पुढे स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पूर्वालाच मिळाले.

तर कळलं का मुलांनो, आपण मोठ्या माणसांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा उपयोग करून घ्यायला हवा. त्यांची मदत घ्यायला हवी. आई-वडील, शिक्षक आपल्याला नेहमी सांगत असतात. ते आपण काळजीपूर्वक ऐकले पाहिजे. खरे आहे ना हे!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -