Sunday, June 16, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यझाडे लावा; झाडे जगवा, वाढवा...!

झाडे लावा; झाडे जगवा, वाढवा…!

माझे कोकण: संतोष वायंगणकर

यावर्षीच्या उष्णतेने कोकणाला अशा काही झळा दिल्या आहेत की, यामुळे उष्णतेने काय आणि किती त्रास होऊ शकतो हेच दाखवून दिले आहे. कोकणात गेल्या काही वर्षांमध्ये बेसुमार वृक्षतोड करण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर येणारी सर्व झाडे तोडण्यात आली. ज्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे त्याच्या पंचवीस टक्के इतकीही लागवड करण्यात आली आहे. दरवर्षी महाराष्ट्रात एक कोटी, दोन कोटी, दहा कोटी वृक्ष लागवड केल्याची आकडेवारी मंत्रालयस्तरावर जाहीर केली जाते. सरकार कोणतेही आणि कोणत्याही पक्षाचे असोत १० कोटी वृक्ष लागवड केल्याचा दावा केला जातो; परंतु प्रत्यक्षात किती लागवड होते हे जनतेला चांगलच ठाऊक आहे. सामाजिक वनीकरण विभाग हा केवळ वृक्ष लागवड, वृक्षसंवर्धनासाठी आहे.

खरंतर या विभागाचा कारभार हा पूर्णपणे कागदावरचा कारभार आहे. प्रत्यक्षात जमिनीवर काहीच नसतं. जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाडं लावली जात असतील, तर कोकणात गर्द झाडी तयार झाली असती; परंतु दुर्दैवाने कोकणच नव्हे तर महाराष्ट्रात तसं चित्र नाही. घाटमार्गाने प्रवास करतानाही घाटांमध्ये असणारी, दिसणारी गर्द झाडी आज कुठे दिसत नाही. डोंगर उजाड झाले आहेत. जुनाट झाडं तर केव्हाचीच नष्ट झाली आहेत. गावठी आंब्याचे मोठाले वृक्ष आज कुठे दिसत नाहीत. वटवृक्षाच्या छायेखाली आपण सर्वजण विसावत होतो; परंतु आता तर ग्रामीण भागात कुठे दोन-पाच वडांची झाडं दिसली तरी आनंद वाटतो. तो गार वारा, वडा-पिंपळांची झाडं एकत्र वाढलेली असतील, तर त्यांची सावली आणि त्यांना प्राप्त होणारं देवत्व सारंच आनंददार्य असतं; परंतु हा सारा भुतकाळ झालायं की काय अशीच सध्याची परिस्थिती आहे. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत आपण वृक्षतोड करून सिमेंटचं जंगल वाढवलंय. बाकी काही नाही. जागो-जागी टोलेजंग इमारती उभ्या राहिल्यात; परंतु त्या इमारती उभ्या करताना सभोवती चार झाडं लागतील याची काळजीच कोणी घेतलेली नाही. यामुळे बेसुमार वृक्षतोड होत राहिली. जे निर्बंध आहेत ते कागदावरच आहेत. यामुळे वृक्ष लागवड ही सक्तीचीच असायला हवी.

वाडवडिलांनी जोपासलेली, वाढवलेले झाड आपण तोडतो आणि आपलं गाव, आपला परिसर उजाड करतोयं. वृक्ष लागवडीसारखा विषय कोणताही राजकीय पक्ष आपल्या अजेंड्यावर घेत होत नाही की त्याची साधी चर्चाही करत नाहीत हे दुदैव आहे. या अशा सामाजिक विषयांना हातात घेऊन एक मिशन म्हणून राबविण्याची कुठल्या संस्थेची इच्छा नाही की, त्यासाठीचे आवश्यक असणारे अथक परिश्रम करण्याची कोणाची मानसिकताही नाही. यामुळे अजिबातच कोणतीच सामाजिक संस्था काही करत नाहीत, असं मी म्हणणार नाही. निदान फोटो काढण्यासाठी का असेना रोपाला हात लावून फोटो काढण्यासाठी फार मोठी स्पर्धां तर समाजात नेहमीच सुरू असते. वनविभागाच्या शासन मालकीच्या जंगलातही मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होते.

वनविभागाचे कर्मचारी, अधिकारी आणि काही लाकूड व्यावसायिक यांच्यातील समझोत्याने चालणारा हा मामला असतो. किती वृक्ष तोडले याची रितसर परवानगी असते आणि प्रत्यक्षात किती जंगल तोड होते हे सर्व वनविभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांना पूर्ण माहिती असते. एकाच लाकूड पासवर दोन-तीन ट्रीप आरामात होऊन जातात. हे सर्व राजरोस, सर्वसहमतीने चालू असते. ज्या सर्व्हे नंबरमध्ये नवीन लागवड करण्यासाठी ही तोड केली जाते. त्याच्या भलत्याच सर्व्हेनंबरमधील वृक्ष तोडले जातात. अशा कितीतरी गोष्टी घडतात. हे थांबलच पाहिजे. बेफाट वृक्षतोडीचे जे परिणाम आहेत ते परिणाम हे आज जरी दुर्लक्षित करण्यासारखे कोणाला वाटत असले तरीही त्याचे फार दूरगामी परिणाम आपणाला निश्चितच सोसावे, भोगावे लागतील. यावर्षी जो उन्हाळा कोकणामध्ये जाणवला आजवर तेवढी परिणामकारकता कधीच नव्हती. त्याची प्रमुख कारणांमध्ये ‘ग्लोबल वॉर्मिंग’ हे जसं कारण पुढे केलं जातं तसं कोकणात होणारी भरमसाट वृक्ष लागवड हे देखील एक कारण आहे. ज्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे, त्याच्या दुप्पट प्रमाणात कोकणात वृक्ष लागवड व्हायला हवी.

या वृक्ष लागवडीमध्ये रायवळ आंबा, चिंच, जांभूळ, फणस याच्या बिया जरी टाकल्या तरीही भविष्यात ही जुन्या आठवणी असणारी झाडं उभी राहतील. पावसाळा सुरू होतोय. कोकणातील जनतेने ज्या ठिकाणी मोकळी जागा असेल, माळरान असतील, डोंगर असतील त्याठिकाणी या बिया टाकायला काहीच हरकत नसावी. आपण टाकलेल्या बियांतून भविष्यात त्याची फळं कोणीही खाल्ली तरीही वाढणारे वृक्ष पाहून निश्चितच आपणाला आनंद मिळेल. रायवळ आंबा, फणस यांच्या कोणी बागायती उभ्या करणार नाही. याचे कारण त्यातून मिळणारे उत्पादन, त्याचा होणारा खर्च, उत्पादन मिळायला लागणारा कालावधी या सर्वांचा विचार करता कशाचाच ताळमेळ घालता येत नाही. तरीही हे नेहमी उत्पन्न मिळू शकते; परंतु तसा प्रयोगही कोणी केलेला नाही. शेवटी आर्थिकदृष्ट्या जे परवडणारे आहे त्याचाच विचार कोणीही शेतकरी करणार. ओसाड, पडीक असलेल्या जमिनींवर, माळरानांवर अशी लागवड करायला हरकत नाही.

ज्या जमिनीवर काहीच उगवणार नाही म्हणून सांगितले जात असेल, तर हा प्रयोग करणे अधिक योग्य ठरेल. यावर्षी पाण्याची तीव्र टंचाई झाली. पुढील वर्षांमध्ये त्याचे प्रमाण वाढत जाऊ शकते. ही धोक्याची घंटा वेळीच ओळखून आपल्याकडून होणारे किमान प्रयत्न आपण करायलाच हवेत. नव्याने रोपं लावली पाहिजेत. त्याचं संगोपन केलं पाहिजे. ती वाढवलीही पाहिजेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -